American Youth Hanuman Chalisa Video: टेक्सासमधील एका अमेरिकन तरुणाचा हनुमान चालीसा पठणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. निक डीअरमन असं या तरुणाचं नाव असून, तो स्वतःला भगवान हनुमानाचा भक्त आणि ‘होलिस्टिक हेल्थ कोच’ म्हणून ओळखतो. त्याने काही काळापूर्वी इन्स्टाग्रामवर हनुमान चालीसा म्हणतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओ मध्ये तो अतिशय वेगाने आणि स्पष्ट उच्चारांसह हनुमान चालीसा म्हणताना दिसत आहे. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
‘आज थोडा उशिरा उठलो, त्यामुळे स्पीड व्हर्जन…’
व्हिडीओच्या सुरुवातीला निक म्हणतो की, तो त्या दिवशी थोडा उशिरा उठला असल्याने त्याला हनुमान चालीसाचं ‘स्पीड व्हर्जन’ म्हणावं लागणार आहे. त्यानंतर तो अत्यंत वेगाने संपूर्ण हनुमान चालीसाचं पठण सुरू करतो. विशेष म्हणजे, त्याचा उच्चार ऐकून अनेक भारतीय नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. व्हिडीओला आतापर्यंत १४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, मोठ्या प्रमाणावर कमेंट्सही करण्यात आल्या आहेत.
‘हा माझ्यापेक्षाही चांगला हनुमान चालीसा म्हणतोय’
निकच्या व्हिडीओखाली भारतीय युजर्सच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका युजरने गंमतीने लिहिलं, “तो माझ्यापेक्षाही चांगला हनुमान चालीसा म्हणतोय.” दुसऱ्या युजरने लिहिलं, “तुम्ही अप्रतिम आहात. हे पाहून मन आनंदाने भरून आलं.” आणखी एका युजरने निकच्या भक्तीचं कौतुक करत म्हटलं की, हनुमानजींबद्दलची त्याची श्रद्धा पाहून अभिमान वाटतो. एका कमेंटमध्ये तर, “आज पहिल्यांदा एका अमेरिकन व्यक्तीने हनुमान चालीसा म्हणताना ऐकलं आणि ते खरोखरच खूप सुंदर होतं,” अशी प्रतिक्रिया देण्यात आली.
‘हनुमान माझे आराध्य दैवत’
निक डीअरमनने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या इतर काही व्हिडीओमध्येही तो भगवान हनुमानाबद्दलची आपली श्रद्धा व्यक्त करताना दिसतो. त्याने स्वतः हनुमानाला आपल्या भक्तीचं प्रमुख दैवत असल्याचं सांगितलं आहे. त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून हनुमान चालीसा आणि हनुमान भक्ती हा त्याच्या दैनंदिन जीवनाचा भाग असल्याचं दिसून येतं.
हनुमान चालीसा म्हणजे काय?
हनुमान चालीसा हे भगवान हनुमानाला समर्पित असलेलं प्रसिद्ध हिंदू भक्तिगीत आहे. संतकवी तुलसीदास यांनी अवधी भाषेत याची रचना केली. ‘चालीसा’ हा शब्द ‘चालीस’ या शब्दावरून आला असून, या स्तोत्राच्या मुख्य भागात ४० चौपाया आहेत. या चौपायांमधून भगवान हनुमान यांच्या शक्ती, धैर्य, भक्ती आणि दैवी गुणांचं वर्णन केलं जातं. भारतात पिढ्यान्पिढ्या हनुमान चालीसेचं पठण केलं जात असून, भगवान हनुमानाशी संबंधित सर्वाधिक लोकप्रिय भक्तिगीतांपैकी हे एक आहे.
कॅप्टन स्मित मच्छार यांनीही संकटात म्हटली हनुमान चालीसा
दरम्यान, भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांनीही फ्लायदुबाईच्या विमानातील हल्ल्याच्या प्रसंगात हनुमान चालीसा म्हटल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या व्हिडीओ कॉलदरम्यान सांगितलं. पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना त्यांनी हनुमानजींना आपला ‘तारणहार’ म्हटलं.
त्यामुळे टेक्सासमधील निक डीअरमनचा हनुमान चालीसा पठणाचा व्हिडीओ आणि कॅप्टन स्मित मच्छार यांनी संकटाच्या काळात हनुमान चालीसा म्हटल्याची माहिती, या दोन्ही घटनांमुळे सोशल मीडियावर हनुमान चालीसेची पुन्हा चर्चा होत आहे.
