US Nationals Detained : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर विमानतळावर सुरक्षा तपासणीच्या दरम्यान दोन अमेरिकी नागरिकांच्या बॅगेतून सॅटेलाइट फोन आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या दोन नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. तसेच पुढील चौकशीसाठी त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची सांगण्यात येत आहे.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या नागरिकांपैकी एकाची जेफ्री स्कॉट अशी ओळख पटली असून तो अमेरिकेच्या मोंटाना येथील रहिवासी आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या बॅगेतून एक सॅटेलाइट फोन जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, भारतात सरकारच्या परवानगीशिवाय सॅटेलाइट फोनचा वापर करण्यास बंदी आहे. त्यामुळे सॅटेलाइट फोन हे कठोर नियमांच्या अंतर्गत येतात. अशा प्रकारच्या सॅटेलाइट फोन्सचा वापर करण्याआधी दूरसंचार विभागाकडून लेखी परवानगी घेणं आवश्यक असतं. अन्यथा अटकेची कारवाई होऊ शकते.

वृत्तानुसार, सॅटेलाइट फोन बाळगल्याप्रकरणी रविवारी श्रीनगर विमानतळावर दोन अमेरिकन नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र, अधिकाऱ्यांच्या मते या अमेरिकी नागरिकांना या फोनवर भारतात बंदी आहे याची माहिती नसावी. पण संपूर्ण प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दोन अमेरिकी नागरिकांनी सॅटेलाइट फोन का बाळगला?

श्रीनगर विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते या अमेरिकी नागरिकांना कदाचित स्थानिक निर्बंधांबाबत माहिती नसावी. त्या नागरिकांच्या मते त्यांच्याकडील सॅटेलाइट फोन हे आपत्कालीन संवाद किंवा मार्गदर्शनाच्या उद्देशाने वापरण्यात येत होते. दरम्यान, भारतातील विविध विमानतळांवर परदेशी प्रवाशांकडे अशा प्रकारचे प्रतिबंधित उपकरणं सापडण्याच्या घटना याआधीही अनेकदा समोर आलेल्या आहेत.

गेल्या वर्षी मे महिन्यात पुदुचेरी येथील विमानतळावर एका अमेरिकी डॉक्टरला थांबवण्यात आलं होतं आणि त्यांच्या ताब्यातून एक सॅटेलाइट फोन सापडला होता. तसेच त्याआधीही एका चिनी नागरिकाच्या आणि एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या ताब्यातूनही सॅटेलाइट फोन अढळून आले होते. अशा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये परवानगीशिवाय सॅटेलाइट फोन बाळगल्याबद्दल त्यांना विमानतळांवर आणि हॉटेल्समध्ये ताब्यात घेण्यात आल्याच्या घटना याआधीही घडलेल्या आहेत.