China Condemns US Strikes On Iran : इस्रायल-इराणमधील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. इस्रायल आणि इराणमध्ये हवाई हल्ले सुरु असून या संघर्षात दोन्ही देशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यातच या दोन्ही देशांच्या संघर्षात आता अमेरिका सहभागी झाली असून अमेरिकेने इराणवर आज मोठे हवाई हल्ले केले आहेत. इराणमधील ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल माध्यमावर या हल्ल्याबाबत माहिती देखील दिली आहे.
अमेरिकेने इराणमधील ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. तसेच इराणवर हवाई हल्ला करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय इतिहास बदलेल, असं बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणमधील ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले केल्यानंतर आता जगभरातील अनेक देशांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर चीनने देखील प्रतिक्रिया देत म्हटलं की, वॉशिंग्टन कदाचित भूतकाळातील धोरणात्मक चुका पुन्हा करत आहे. अमेरिकेची ही कृती धोकादायक वळण घेत आहे, असं म्हणत चीनने अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध केला आहे.
चीनने काय म्हटलं?
अमेरिकेने इराणवरील हल्ल्यावर चीनने प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी प्रश्न उपस्थित केला की अमेरिका इराकमध्ये जी चूक केली होती तीच चूक इराणमध्ये पुन्हा करत आहे का? चीनच्या राज्य प्रसारकाच्या परदेशी भाषा शाखेच्या सीजीटीएनच्या एका ऑनलाइन लेखात म्हटलं की, अमेरिकेची कृती एक धोकादायक वळण घेत आहे. इतिहासाने वारंवार दाखवून दिलं आहे की पश्चिम आशियातील लष्करी हस्तक्षेप अनेकदा अनपेक्षित परिणाम निर्माण करतात. ज्यामध्ये संघर्ष वाढणे आणि सतत प्रादेशिक अस्थिरता यांचा समावेश आहे”, असं लेखात २००३ मध्ये इराकवरील अमेरिकेच्या आक्रमणाचा हवाला देत म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने म्हटलं आहे.
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यांनंतर पाकिस्तानने काय म्हटलं?
अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले करून फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानमधील तीन अणु प्रकल्पांवर हल्ले केले. मात्र, पाकिस्तानने रविवारी या अणु प्रकल्पांवर अमेरिकेच्या या हल्ल्यांचा निषेध केला आहे. हे हल्ले करून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केल्याचं सांगत इराणला स्व-रक्षणाचा हक्क असल्याचंही म्हटलं आहे. पाकिस्तानने म्हटलं की, “इस्त्रायलच्या हल्ल्यांच्या मालिकेनंतर इराणी अणु प्रकल्पांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांचा पाकिस्तान निषेध करतो. या प्रदेशातील तणाव आणखी वाढण्याच्या शक्यतेमुळे आम्ही गंभीर चिंतेत आहोत”, असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. पश्चिम अशियात वाढलेला तणाव हा अत्यंत विचलित करणारा असल्याचे तसेच हा तणाव आणखी वाढल्यास या प्रदेशासाठी आणि त्याच्याही पलीकडे याचे गंभीर हानिकारक परिणाम होतील असेही पाकिस्तानने म्हटले आहे.
अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात नष्ट झालेले ३ अणुकेंद्र कोणते?
अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकन आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या कारवाईत अमेरिकन स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू-५७ बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आले. जे मजबूत भूमिगत टार्गेट करण्यास सक्षम आहेत. दरम्यान, अमेरिकेने इराणमधील ३ अणुकेंद्रावर हल्ला केला. यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ला केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.