गेल्या काही दिवसांपासून देशात कोळशाच्या संभाव्य टंचाईची मोठी चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे राज्य स्तरावर कोळशाचा पुरवठा होत नसल्याचं चित्र दिसत असताना दुसरीकडे केंद्रीय पातळीवरून मंत्र्यांकडून कोळसा टंचाई नसल्याचं स्पष्ट केलं जात आहे. त्यामुळे नेमकी कोळशाच्या पुरवठ्याची परिस्थिती काय आहे आणि खरंच देशात वीजकपात करण्याची वेळ येऊ शकते का? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या प्रकाराचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे.

दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात देखील महावितरणकडून वीज वापरामध्ये काटकसर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आगामी काळात देशाच्या अनेक भागांमघ्ये वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोळसा उत्पादन, पुरवठा आणि वीजनिर्मिती या सर्व बाबींचा आज आढावा घेणार आहेत.

कोळशाच्या तुटवड्यामुळे दिल्लीत वीज संकट?; केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी दिले उत्तर

यासंदर्भात सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोळसा आणि वीज उत्पादन, वितरणाशी संबंधित मंत्र्यांची बैठक घेऊन त्यामध्ये सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर अमित शाह यांनी देशात कोणत्याही प्रकारची कोळसा टंचाई नसल्याचा दावा केला आहे. मात्र, काही राज्यांनी याआधीच कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे वीजटंचाई निर्माण होण्याची भिती व्यक्त केली आहे.

भारनियमनाचे सावट! राज्यात कोळशाअभावी १३ वीजनिर्मिती संच बंद; तूट भरून काढण्याचे आव्हान

राज्यात कोळसाटंचाई, महावितरणकडून हालचाली सुरू

देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील औष्णिक वीजनिर्मिती हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक हे प्रत्येकी २१० मेगावॉटचे तसेच पारस- २५० मेगावॉट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॉटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॉटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॉटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.