तामिळनाडूत थलपती विजयची निवडणूक निकालाच्या दिवशी विजयी घोडदौड सुरु आहे. ५० वर्षांच्या द्रविडी राजकारणाची परंपरा विजय मोडणार हे निश्चित झालं आहे. सुपरस्टार थलपती विजयच्या नेतृत्वात TVK पक्षाने १०३ जागांहून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. कोलाथूर या बालेकिल्ल्यातून विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन पिछाडीवर आहेत. या ठिकाणी टीव्हीकेचे उमेदवार व्ही.एस. बाबू यांनी आघाडी घेतली आहे. दरम्यान विजयने त्याच्या जाहीरनाम्यात विविध वचनं दिली आहेत ज्याची पूर्तता आता केली जाणार का? हा प्रश्नही विचारला जातो आहे.

थलपती विजयच्या जाहीरनाम्यात काय आश्वासनं?

१) तामिळनाडूत लग्न करताना प्रत्येक मुलीला ८ ग्रॅम सोनं सरकारकडून दिलं जाईल. ही सरकारी मदत म्हणून त्या कुटुंबाला भेट असेल.

२) राज्यातील महिलांसाठी दर महिना २५०० रुपये दिले जातील, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींची पेन्शन दरमहा ३ हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल.

३) आमचा पक्ष सत्तेत आला तर जे लोक भूमिहीन आहेत त्यांना सरकारकडून मोफत जमीन दिली जाईल. गरीब लोकांना शासकीय जमीन भाडेपट्ट्यावर दिली जाईल.

४) आमची सत्ता आल्यास दरवर्षी कुटुंबांना दरवर्षी २०० युनिट मोफत तसंच सहा मोफत गॅस सिलिंडर दिले जातील.

५) महिलांना ५ लाख रुपये बिनव्याजी कर्ज दिलं जाईल

६) पदवीधारक बेरोजगारांना ४ हजार रुपयांची मदत केली जाईल. इंटर्नशिपासाठी ५ लाख लोकांना नोकऱ्या मिळतील. पुढील पाच वर्षात ५० हजार नोकरीच्या संधी निर्माण करु

७) पहिली ते बारावी या दरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी १५ हजार रुपयांची मदत केली जाईल. आर्थिक चणचण भासल्याने कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये ही आमची धारणा आहे.

मागील दोन वर्षांपासून विजय करत होता तयारी

ही आश्वासनं विजयच्या जाहीरनाम्यात आहेत. तामिळनाडूतल्या सुपरस्टार्स अभिनेत्यांमध्ये विजयची गणना होते. स्वच्छ आणि पारदर्शी कारभार हे आमचं धोरण असेल असं आश्वासन विजयने दिलं होतं. मागील दोन वर्षे विजय निवडणुकांना सामोरं जाण्यासाठीची तयारी करत होता. ज्याचाच परिणाम तामिळनाडूच्या निवडणूक निकालांमध्ये पाहण्यास मिळाला.

२०२४ मध्ये विजयच्या पक्षाची स्थापना

२ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाची स्थापना केल्यानंतर विजयने विलुप्पुरम जिल्ह्यातील विक्रवंडी येथे २८ ऑक्टोबर रोजी आपल्या पक्षाची पहिली सभा घेतली होती.

विजयच्या पहिल्याच सभेला तीन लाख लोक जमले होते. पहिल्याच सभेत विजयने आपली राजकीय विचारधारा काय आहे? आपण कोणाविरोधात लढणार आहोत, हे स्पष्ट केले होते.

भाजपाप्रणित केंद्र सरकार आणि द्रमुकच्या नेतृत्वाखालील तमिळनाडू सरकारवर टीका करताना आपला पक्ष जातीविरोधी, धर्मनिरपेक्ष विचारधारा राखणारा असेल, हे विजयने स्पष्ट केलं होतं.

Thalapaty Vijay News
थलपती विजयची तामिळनाडूत विजयी घोडदौड (फोटो-फेसबुक पेज )

विजयची आघाडी हा ठरतोय चर्चेचा विषय

तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत विजयची जोरदार मुसंडी पाहण्यास मिळते आहे. सुरुवातीला जे कल हाती येत होते त्यात DMK, AIAMK आणि TVK यांच्यात चुरस पाहण्यास मिळाली. त्यानंतर विजच्या टीव्हीके या पक्षाने आघाडी घेतली. ६४ जागांवर घेतलेली ही आघाडी विजय आणि त्याच्या पक्षाला पुढे घेऊन गेली यात शंका नाही. एक्झिट पोल्समध्ये विजयच्या टीव्हीके पक्षाला ९८ ते १२० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. ज्याच दिशेने हे कल जात आहेत हे दिसून येत आहे.

थलपती विजय हे नाव कसं मिळालं?

१९९० पासून विजय दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा स्टार आहे. त्याचे वडील एस चंद्रशेखर यांनी रसिगन नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यात इलयाथलपती हे टायटल देण्यात आलं होतं. त्याचा अर्थ होतो तरुण नेता. ज्यानंतर त्यांचं नाव थलपती विजय असंच ओळखलं जाऊ लागलं. २०१२ चा थुपक्की, २०१३ मध्ये आलेला थलाइवा, २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला कत्थी आणि मर्सल या चित्रपटांमध्ये विजय हा यंत्रणेच्या विरोधात लढणारा नायक म्हणून लोकांसमोर आला. त्यानंतर रिल लाइफमधून त्याने रिअल लाइफमध्ये राजकारणात आला. त्याच्या टीव्हीके या पक्षाने या निवडणुकीत करीश्मा करुन दाखवला.