LeT Founder Amir Hamza Shot: लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक सदस्य असलेला दहशतवादी अमीर हमजा याला लाहोरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घातल्याची घटना समोर आली आहे. हमजाची प्रकृती सध्या चिंताजनक असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लाहोर येथील एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

प्रकृती चिंताजनक

लाहोर पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, “तहरीक-ए-हुरमत-ए-रसूल पाकिस्तानचे अध्यक्ष यांच्या गाडीवर लाहोरमधील हमदर्द चौकात अज्ञातांनी गोळीबार केला. गाडीतील सर्वजण सुरक्षित असले तरी अमीर हमजा याची तब्येत चिंताजनक आहे. गोळीबार कोणी केला? याचा शोध पोलिस घेत आहेत.”

वृत्तवाहिनीच्या बाहेर गोळीबार

समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, लाहोर येथील एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर काही अज्ञातांनी हमजा याच्यावर गोळीबार केला यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी देखील त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र, अज्ञातांनी घटनास्थळावरुन पळ काढला, असे पोलिसांनी सांगितले आहे.

लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक सदस्य

दहशतवादी हाफीज सईद याच्यासह अमीर हमजा याने लष्कर-ए-तोयबाची स्थापना केली होती. अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. शिवाय भारतात देखील काही दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात असल्याचे समोर आले आहे. भडकाऊ भाषणं आणि प्रक्षोभक लिखाणासाठी हमजाची ओळख आहे. त्याने अनेक वादग्रस्त पुस्तक आणि लेख प्रसिद्ध केल्याचे सांगितले जाते.

नव्या दहशतवादी संघटनेची स्थापना

अमेरिकेने लष्कर-ए-तोयबावर कठोर निर्बंध लादले आहेत यात हमजाची दहशतवादी म्हणून नोंद करण्यात आली आहे. दहशतवादी संघटनेसाठी निधी गोळा करणे, त्यात तरुणांची भरती करणे आणि वाटाघाटी करण्यात हमजा पुढाकार घेत असल्याचे समोर आले आहे. २०१८ नंतर लष्कर-ए-तोयबापासून तो काहीसा लांब राहू लागला. त्याने जैश-ए-मानकाफा या दहशतवादी संघटनेची स्थापना केल्याचे सांगितले जाते.