केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दहशतवादविरोधी ‘प्रहार’ (PRAHAAR) रणनीती पुढील १० वर्षांसाठी संस्थात्मक करण्याचे आवाहन केले. दहशतवादी घटनांचे सातत्याने विश्लेषण करून प्रत्येक स्तरावर स्वयंचलित प्रतिसाद यंत्रणा (automated response mechanism) उभारण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच ‘प्रहार’ची तत्त्वे पोलीस ठाण्याच्या पातळीपर्यंत पोहोचली पाहिजेत, यावरही त्यांनी भर दिला. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
नवी दिल्ली येथे ‘प्रहार – दहशतवादविरोधी धोरण आणि रणनीती’ या विषयावरील परिषदेत उद्घाटनपर भाषण करताना अमित शाह यांनी ही भूमिका मांडली. ‘प्रहार’ रणनीती अधिक मजबूत आणि प्रभावी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असून, त्यातील प्रत्येक बाबीकडे सक्रिय आणि परिणामाभिमुख दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन त्यांनी संबंधित यंत्रणांना केले. ‘प्रहार’ची तत्त्वे पोलीस ठाण्याच्या स्तरापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. कारवाईमध्ये कोणताही विलंब होऊ नये यासाठी सर्व संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय असला पाहिजे, असे शाह यांनी सांगितले.
‘प्रहार’चे सात प्रमुख स्तंभ
या परिषदेत संपूर्ण समाजाच्या सहभागातून ‘प्रहार’च्या सात प्रमुख स्तंभांवर चर्चा करण्यात आली.
- दहशतवादाला प्रतिबंध
- तातडीने प्रतिसाद
- अंतर्गत क्षमतांचे एकत्रीकरण
- मानवी हक्कांचे संरक्षण
- दहशतवादाला पोषक परिस्थिती कमी करणे
- आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये समन्वय
- पुनर्बांधणी आणि प्रतिकारक्षमता
दहशतवादी धोक्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांचाही अमित शाह यांनी आढावा घेतला. दहशतवादविरोधी संपूर्ण यंत्रणेत स्वयंचलित प्रतिसाद व्यवस्था संस्थात्मक करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या परिषदेला केंद्रीय गृहसचिव, परराष्ट्र सचिव, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांचे प्रमुख, १५ राज्यांचे पोलीस महासंचालक तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या दहशतवादविरोधी पथकांचे प्रमुख उपस्थित होते. इतर राज्यांचे पोलीस प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.
३६ देशांतून २८८ फरार गुन्हेगार भारतात परत
यंत्रणांमधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करताना अमित शाह यांनी सांगितलं की, २०१९ ते २०२६ या कालावधीत मोदी सरकारने ३६ देशांमधून २८८ फरार गुन्हेगारांना भारतात परत आणलं आहे. शस्त्रे, स्फोटके आणि अंमली पदार्थांच्या सीमापार तस्करीत कथितरीत्या सहभागी असलेल्या शहजाद भट्टी नेटवर्कच्या ४० हून अधिक मॉड्यूल्सचा यंत्रणांमधील चांगल्या समन्वयामुळे पर्दाफाश करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
या कारवायांमध्ये १५ राज्यांमध्ये १०० हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले असून, ३५० जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती शाह यांनी दिली. तसेच सरकारने बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत शहजाद भट्टी नेटवर्कला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरोधात ‘शून्य सहनशीलता’ धोरण स्वीकारलं असल्याचं शाह यांनी नमूद केलं.
फरार आरोपींना भारतात आणण्यासाठी नवे ‘प्रत्यार्पण पोर्टल’
अमित शाह यांनी यावेळी नवे ‘प्रत्यर्पण पोर्टल’ (Extradition Portal) देखील सुरू केले. परदेशात पळून गेलेल्या फरार आरोपींना भारतात परत आणण्याच्या प्रयत्नांमध्ये विविध यंत्रणांमध्ये समन्वय वाढवणे आणि प्रक्रिया अधिक जलद करणे, हा या पोर्टलचा उद्देश आहे. फरार आरोपींना भारतात परत आणण्यासाठी राज्य पोलीस दलांनी केंद्रीय तपास आणि सुरक्षा यंत्रणांसोबत समन्वय साधणारी स्वतंत्र समर्पित पथके स्थापन करावीत, असे आवाहनही अमित शाह यांनी केले.
