दिब्रुगढ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या ‘ॲट होम’ समारंभात राष्ट्रपतींनी दिलेला ‘गमछा’ परिधान करण्यास नकार देऊन ईशान्येचा अपमान केल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. परदेशी मान्यवरांसह सर्वांनीच सन्मान म्हणून हा गमछा परिधान केला होता; मात्र तो नाकारलेली व्यक्ती केवळ राहुल गांधीच होते, असा दावा शहा यांनी येथे खानिकार परेड मैदानावर आयोजित सभेत केला.

गृहमंत्री शहा म्हणाले, राहुल गांधींना जे हवे तसे ते करू शकतात; पण भाजप सत्तेत असताना ईशान्येच्या संस्कृतीचा कोणताही अपमान होऊ दिला जाणार नाही. काँग्रेसने आसामच्या विकासासाठी काहीही केले नाही. काँग्रेसने आसामला आतापर्यंत बंदुका, गोळ्या, संघर्ष आणि तरुणांचे मृत्यू याशिवाय काय दिले? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने घुसखोरीला ‘मतपेढीच्या राजकारणाचे हत्यार’ म्हणून वापरल्याचा आरोपही त्यांनी केला.

शहा म्हणाले, भाजप सत्तेत आल्यानंतर आसाममध्ये कोणतीही घुसखोरी झालेली नाही. जे बेकायदेशीररीत्या भारतात आले आहेत, त्यांची ओळख पटवून त्यांना परत पाठवले जाईल. मागील निवडणुकांपूर्वी भाजपने घुसखोरी रोखण्याचे आश्वासन दिले होते. आसामची लोकसंख्यात्मक रचना बदलत होती आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करत होती, त्यामुळे आम्ही दिलेले वचन पाळले आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सर्व समुदायांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करून समान हक्क निश्चित केले आहेत.

दिब्रुगढसह आसामला देशाची ‘चहाची राजधानी’ बनविणाऱ्या चहा मळ्यातील कामगारांच्या कल्याणासाठी काँग्रेसने काहीही केले नाही उलट चहा मळ्यातील कामगारांना जमिनीचे मालकी हक्क मिळावेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी कायद्यात दुरुस्ती केली, असे ते म्हणाले. हुतात्मा दिनानिमित्त त्यांनी महात्मा गांधींना श्रद्धांजलीही अर्पण केली.

बॉक्स भारत आणि युरोपीय महासंघ (ईयू) यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे आसामचा चहा विनाशुल्क युरोपीय देशांमध्ये निर्यात होईल, या करारामुळे आसामच्या चहाच्या निर्यातीला युरोपीय देशांमध्ये मोठी चालना मिळेल, असे शहा म्हणाले. विकास, शांतता, सुरक्षा तसेच औद्योगिक व कृषी प्रगतीसाठी. तसेच आसामला घुसखोरी आणि पुरमुक्त करण्यासाठी भाजपला तिसऱ्यांदा सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी केले.