नवी दिल्ली, पाटणा : रामनवमीच्या दिवशी बिहारमध्ये झालेल्या धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सासारामचा दौरा रद्द केला. भाजपचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. धार्मिक तणावामुळे सासाराम जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी होऊन जमावबंदी लागू झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
रामनवमी उत्सवादरम्यान देशात अनेक ठिकाणी धार्मिक तणाव आणि दंगलीच्या घटना घडल्या. बिहारमधील सासाराम आणि बिहार शरीफ या ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण झाला. त्यामुळे राज्य सरकारने सासाराम जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. त्या पार्श्वभूमीवर शहा यांनी सासारामचा दौरा रद्द केला. तिथे ते सम्राट अशोकाच्या जयंती सोहळय़ाला उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांचा उर्वरित बिहार दौरा पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे होणार आहे असे चौधरी यांनी सांगितले. रविवारी त्यांची नवाडा येथे जाहीर सभा होणार आहे असे पक्षातर्फे सांगण्यात आले. अमित शहा यांचा कार्यक्रम रद्द झाल्याबद्दल चौधरी यांनी राज्य सरकारला जबाबदार ठरवले.
बिहार शरीफ हा भाग मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा नालंदा जिल्ह्यात आहे. तिथेही त्यांना परिस्थिती ताब्यात ठेवता आली नाही, नालंदाप्रमाणेच राज्यातील अनेक भागांमध्ये तणाव असल्याचा दावा चौधरी यांनी केला. केंद्रीय गृहाराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बिहारला अतिरिक्त सुरक्षा दले पाठवण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु प्रशासकीय यंत्रणा निद्राधीन असावी, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, सासाराम आणि बिहार शरीफ येथील धार्मिक तणाव काही जणांनी जाणीवपूर्वक निर्माण केला, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिला. दंगलीप्रकरणी बिहारमध्ये आतापर्यंत ४५ जणांना अटक करण्यात आली आहे. या भागात अशी कृत्ये घडत नाहीत, ती घडवण्यात आली आहेत असे ते म्हणाले.