लोकसभा निवडणुकीमधली भारतीय जनता पार्टीची कामगिरी ही आत्तापर्यंतची सगळ्यात चांगली असली तरी ही सर्वोत्कृष्ट कामगिरी नसून यापेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष्य असल्याचं अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितलं आहे. भाजपानं नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये लोकसभेत तब्बल 303 जागा जिंकल्या आहेत.

भाजपाच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची बैठक शाह यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी पार पडली. यावेळी अमित शाहंनी मांडलेले मुद्दे भाजपाचे महासचिव भूपेंदर यादव यांनी पत्रकारांना सांगितले. नवीन प्रदेशांमध्ये व समाजाच्या अन्य स्तरांमध्ये पोचण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाच्या करोडो कार्यकर्त्यांनी व पाठिराख्यांनी केलेल्या अथक परीश्रमांमुळे पक्षाला यश मिळाल्याचे शाह म्हणाले. 220 मतदारसंघांमध्ये भाजपाला 50 टक्क्यांहून जास्त मतं मिळाली आहेत. शिवराज सिंहांच्या नेतृत्वाखाली सदस्यता मोहीम राबवण्यात येणार असून त्यांच्या साथीला आणखी चार जणं देण्यात येणार आहेत. सध्या भाजपाचे 11 कोटी सदस्य असून यात 20 टक्क्यांची 2.2 कोटींची वाढ करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

सदस्यता मोहीम झाल्यानंतर पक्षाचा पुढील अध्यक्ष ठरवण्यासाठी पक्षांतर्गत निवडणुका घेण्यात येतील असे यादव यांनी सांगितले. याआधी सप्टेंबर 2018 मध्ये दिल्लीमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुका होईपर्यंत पक्षांतर्गत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे जानेवारीमध्ये शाह यांची अध्यक्षपदाची मुदत संपत असूनही ती वाढवण्यात आली.

शाह यांनी जुलै 2014 मध्ये राजनाथ सिंह यांच्याकडून पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. एक व्यक्ती एक पद असं भाजपाचं धोरण असून त्यामुळे मंत्रिमंडळात समावेश झालेल्या राजनाथ सिंहांनी पक्षाध्यक्षपद सोडलं होतं. त्यानंतर शाह यांची तीन वर्षांसाठी बिनविरोध निवड झाली होती. भाजपाच्या घटनेनुसार एखाद्या व्यक्तिला तीन वर्षांच्या दोन टर्म अध्यक्षपदी राहता येतं. या तरतुदीचा विचार केला अमित शाह आणखी एक टर्म या पदी राहू शकतात.