पीटीआय, हैदराबाद
मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर), इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र आणि घुसखोरांच्या मुद्द्यावर केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यास तयार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी स्पष्ट केले. या मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी चर्चेला समोर यावे असे आव्हानही त्यांनी दिले.
निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ विरोधात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी भाजपने सोमवारी देशभरात विविध ठिकाणी ‘लोकशाही वाचवा, अराजकता संपवा’ अशी घोषणा देत पदयात्रा काढली. हैदराबाद येथील पदयात्रेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कोळसा मंत्री किशन रेड्डी, गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांच्यासह तेलंगणातील अनेक नेते सहभागी झाले.
“काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना ‘एसआयआर’ प्रक्रिया थांबवायची आहे, कारण देशातील घुसखोर ही त्यांची मतपेटी आहे. मात्र आम्ही या घुसखोरांना मतदार यादीतून बाहेर काढणार आहोत. यापुढे केवळ भारतीय नागरिकांनाच मतदान करता येईल,” असा दावा अमित शहा यांनी केला. ते म्हणाले. “इंडिया आघाडीचा दिल्लीतील मोर्चा म्हणजे ‘घुसखोरांना वाचवा’ मोर्चा होता. देशातील १३ कोटी मतदारांना वगळले, असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. पण ते खोटे बोलतात.”
प. बंगाल, बिहारमध्येही पदत्रात्रा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता येथे पदयात्रा काढण्यात आली. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आदींसह अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी बिहारमधील भागलपूर येथे आयोजित पदयात्रेतही नितीन नबीन सहभागी झाले होते. यावेळी नितीन नबीन यांनी देशात अस्थिरता आणण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा परतीय शक्तींकडून वापर केला जात असल्याचा आरोप केला. जेव्हा देशभरात ‘एसआयआर’चे काम सुरू होते, तेव्हा काँग्रेस, राष्ट्रीय जनत दलासह अन्य विरोधी पक्ष मतदारांच्या नोंदीतील गैरसोयी दूर करण्याऐवजी त्यांच्यामध्ये गैरसमज पसरवण्यात मग्न होते. त्यामुळे त्यांना योग्य माध्यमातून मतदारांच्या तक्रारीच दाखल करत आल्या नाहीत. मात्र आता ‘एसआयआर’ प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही नबीन यांनी केली.
मुळात काँग्रेसला बोगस मतदारांच्या माध्यमातूनच सत्तेत येण्याची इच्छा आहे. मात्र ‘एसआयआर’मुळे काँग्रेस अनेक राज्यांत सत्तेत येऊ शकलेली नाही आणि आता राहुल गांधी कधीच पंतप्रधान बनू शकणार नाही. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
