नवी दिल्लीमधील इंदिरा भवन येथे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम’चं गायन सुरू असताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याकडून ते थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. हा ‘वंदे मातरम’चा अपमान असल्याची टीका भाजपाकडून करण्यात येत आहे. मात्र, काँग्रेसकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. यावरून मोठा वाद निर्माण झाला असून भाजपा आणि काँग्रेसचे नेते एकामेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.

आता हाच मुद्दा उपस्थित करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. ‘देशातील जनता काँग्रेसला माफ करणार नाही, थोडी जरी लाज शिल्लक असेल तर काँग्रेसने देशाची माफी मागावी’, अशा शब्दांत अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. राजस्थानमधील चित्तौडगड येथे एका सभेत शाह बोलत होते.

अमित शाह काय म्हणाले?

“त्यांची (काँग्रेसची) निर्लज्जपणाची हद्द पाहा. काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात ‘वंदे मातरम’ गायलं जातं होतं. त्यादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षांना ‘वंदे मातरम’ थांबवण्यास सांगितलं. हे आपण सर्वांनी टीव्हीवर पाहिलं. सोनिया गांधींजी १४० कोटी जनता तुम्हाला पाहत आहे. तुम्ही केलेलं हे पाप देशातील जनता कधीही माफ करणार नाही. ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगाण अर्धवट सोडण्याचा विचार कोणी कसं करू शकतं? काँग्रेसच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे. थोडी जरी लाज शिल्लक असेल तर दोन्ही हात जोडून काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे”, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

भाजपाने काय आरोप केले?

भाजपाच्या नेत्यांनी काँग्रेसवर राष्ट्रीय गीताचा अपमान केल्याचा आरोप केला. “व्होट बँकेच्या राजकारणासाठी काँग्रेसने पुन्हा एकदा ‘वंदे मातरम’चा अपमान केला”, अशी टीका भाजपाकडून करण्यात येत आहे. भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी म्हटलं की, “व्होट बँकेच्या लांगूलचालनासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ‘वंदे मातरम’चे पूर्ण गायन थांबवण्याचा प्रयत्न केला. ‘वंदे मातरम’चा द्वेष असल्यामुळेच काँग्रेस लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहिली नाही.”

तसेच भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटलं की, “दशकांपासून, गांधी आणि काँग्रेसचे सांस्कृतिकदृष्ट्या आत्मविश्वासू, सभ्यतावादी मुळे असलेल्या भारताच्या कल्पनेशी अस्वस्थ संबंध राहिले आहेत. तीच अस्वस्थता, दुर्दैवाने स्वातंत्र्यदिनी उघडी पडली.”

काँग्रेसने काय स्पष्टीकरण दिलं?

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी हे दावे फेटाळून लावले. कार्यक्रमात ‘वंदे मातरम’चे पूर्ण व्हर्जन गाण्यात आले होते आणि ते थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नसल्याचं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमातील पूर्ण ‘वंदे मातरम’ गायनाबद्दल विचारलं असता, जयराम रमेश यांनी पत्रकारांना सांगितलं की, “इंदिरा भवनमध्ये ‘वंदे मातरम’चं पूर्ण व्हर्जन गाण्यात आलं आणि यात कोणताही वाद नाही. ते थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. काँग्रेस अध्यक्ष बऱ्याच वेळ उभे असल्याने, सोनिया गांधी त्यांच्यासाठी खुर्ची आणण्यास सांगत होत्या”, असं स्पष्टीकरण जयराम रमेश यांनी दिलं आहे.