मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी कार्यक्रमावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर घेतलेल्या मोठ्या सभेनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. “काँग्रेसला बोगस मतदानाच्या जोरावर निवडणुका जिंकायच्या आहेत. अवैध बांगलादेशी घुसखोरांचे रक्षण करण्यासाठीच काँग्रेस SIR प्रक्रियेला विरोध करत आहे,” असा थेट आरोप अमित शाह यांनी केला. तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील बशीरबाग भागात भारतीय जनता पक्षाच्या ‘महापदयात्रे’त अमित शाह बोलत होते. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
३ कोटी मतदार अस्तित्वातच नाहीत; ते बांगलादेशी घुसखोर!
विरोधकांकडून मतदारयाद्यांमधून १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप केला जात आहे. यावर उत्तर देताना गृहमंत्र्यांनी सर्व आकडेवारीच स्पष्ट केली. शाह म्हणाले, “वगळण्यात आलेल्या एकूण नावांपैकी सुमारे ६.२५ कोटी मतदारांचे नवीन पत्त्यावर स्थलांतर झाले आहे. सुमारे ३ कोटी मतदारांचा मृत्यू झाला आहे, तर १ कोटी नावे ही डुप्लिकेट होती. उरलेले ३ कोटी मतदार तर मुळात अस्तित्वातच नाहीत; ते अवैध बांगलादेशी घुसखोर आहेत.”
काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना शाह म्हणाले, “एकाच व्यक्तीचे दोन ठिकाणी मतदान असेल तर एक नाव रद्द करायला नको का? पण राहुल बाबांच्या पोटात का दुखतेय, याचे मूळ कारण वेगळेच आहे. ज्या ३ कोटी लोकांची नावे यादीत नाहीत, ते देशाचे नागरिक नसून बांगलादेशी घुसखोर आहेत. हेच काँग्रेसचे खरे व्होट बँक राजकारण आहे.”
‘मोदींचा विजय SIR मुळे नाही, तर जनतेच्या पाठिंब्यामुळे’
“SIR मुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुका जिंकतात,” या राहुल गांधींच्या दाव्याचा गृहमंत्र्यांनी समाचार घेतला. “२०१४ मध्ये मोदीजी जिंकले, तेव्हा SIR प्रक्रिया होती का? २०१९ च्या विजयावेळी SIR होते का? मोदींचा विजय हा भारतातील जनतेच्या विश्वासामुळे आणि मतांमुळे झाला आहे. २०२४ नंतर महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली आणि बिहारमध्ये भाजपला मिळालेला अभूतपूर्व विजय हे याचेच जिवंत उदाहरण आहे,” असे शाह यांनी स्पष्ट केले.
तसेच, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि राहुल गांधी यांनी कितीही प्रयत्न केले, तरी भाजपा प्रत्येक घुसखोराला मतदारयादीतून हटवून देशाबाहेर हाकलून लावेल, असा इशाराही त्यांनी दिला.
‘सरदारांमुळेच हैदराबाद भारतात’
भाषणादरम्यान अमित शाह यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाचे स्मरण केले. “जर त्यावेळी सरदार पटेल यांनी निजामाला झुकवले नसते, तर आज हैदराबाद भारताचा भाग नसता,” असे अमित शाह यांनी नमूद केले.
विरोधकांच्या SIR विरोधी प्रचाराला उत्तर देण्यासाठी भाजपाकडून देशभरात अभियान राबवले जात आहे. याचाच एक भाग म्हणून गृहमंत्र्यांनी हैदराबादमध्ये बाबू जगजीवन राम यांच्या पुतळ्यापासून भव्य महापदयात्रेचे नेतृत्व केले. या पदयात्रेत केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, बंदी संजय कुमार, तेलंगणा भाजप अध्यक्ष एन. रामचंद्र राव यांच्यासह पक्षाचे अनेक खासदार, आमदार आणि शेकडो कार्यकर्ते हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले होते.
