रायपूर : सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवून आखलेले धोरण, पायाभूत सुविधांचा विकास आणि नक्षलवाद्यांना होणाऱ्या आर्थिक पुरवठ्यात व्यत्यय यामुळे नक्षलवाद्यांविरोधातील लढाईचा अपेक्षित परिणाम झाला आहे, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी व्यक्त केले. देशातून ३१ मार्चपर्यंत नक्षलवादाचा संपूर्ण नायनाट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शहा यांनी रविवारी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे नक्षलवादाच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत सहभाग घेतला. नवा रायपूर अटल नगर येथे एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीला छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे (आयबी) संचालक आणि विशेष गृह सचिव यांच्यासह केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा या संस्थांचे महासंचालक, तसेच छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र, झारखंड आणि तेलंगण या राज्यांचे पोलीस महासंचालक या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर शहा यांनी एक्सवर पोस्ट लिहून आपली भूमिका मांडली. विविध उपाययोजनांमुळे नक्षलवाद्यांच्या शरणागतीचे प्रमाण वाढल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.