भाजप अध्यक्षांचे विरोधकांना आव्हान

राष्ट्रीय नागरिक नोंदणी मुद्दय़ावर विरोधक मतपेढीचे राजकारण करत आहेत असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही ही प्रक्रिया पार पाडली आहे. त्यामुळे बेकायदेशीर बांगलादेशींना भारतात राहू द्यावे की परत पाठवावे हे काँग्रेस, समाजवादी पक्ष किंवा बहुजन समाज पक्षाने स्पष्ट करावे असे आव्हान त्यांनी दिले.

मुघलसराई जंक्षनला संघ विचारक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात आले. त्या वेळी कार्यक्रमात शहा यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. घुसखोरांच्या मुद्दय़ावर जनतेच्या भावना मला माहीत आहेत. मात्र राजकीय पक्षांनी बोलावे, कारण एकही घुसखोर भारतात राहता कामा नये अशी आमची भूमिका आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा काँग्रेस राष्ट्रीय नागरिक नोंदणीला आक्षेप घेत आहे असा आरोप शहा यांनी केला. त्यामुळे देशात ही नोंदणी करावी की नाही याचे उत्तर राहुल गांधी देत नाहीत अशी टीका भाजप अध्यक्षांनी केली. त्यामुळे घुसखोरांची परत पाठवणी करायची की नाही हे तुम्ही सर्वानी सांगावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. तसेच इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या विधेयकाबाबत राज्यसभेत काँग्रेसने भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान त्यांनी दिले. लोकसभेने हे विधेयक संमत केले आहे. आता राज्यसभेत ते जाणार आहे. त्यामुळे या मुद्दय़ावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भूमिका स्पष्ट करावी. याबाबत ते सरकारला मदत करणार काय, यावरून त्यांचा हेतू दिसेल असे शहा यांनी सांगितले. या प्रस्तावित विधेयकामुळे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा मिळणार आहे.