मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मागील काही दिवसांपासून देशभरात आंदोलन सुरू आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात इंडिया आघाडीच्यावतीने १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं.
इंडिया आघाडीच्या १ नोव्हेंबरच्या रॅलीनंतर आता भाजपाच्यावतीने आज (२ नोव्हेंबर) हैदराबादमध्ये ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ महारॅली काढण्यात आली. या महारॅलीच्या सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘भाजपा प्रत्येक घुसखोराला बाहेर काढणारच’, असं म्हणत मतदार यादीतील घुसखोरांना काँग्रेस संरक्षण देत असल्याचा आरोप यावेळी बोलताना अमित शाह यांनी केला आहे.
अमित शाह काय म्हणाले?
“हैदराबादमध्ये आज हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ या महारॅलीसाठी हे लोक रस्त्यावर उतरले आहेत. काल दिल्लीत एक रॅली काढण्यात आली होती आणि ती रॅली राहुल गांधींनी आयोजित केली होती. राहुल गांधींनी दावा केला की त्यांची रॅली ‘व्होट बचाव’ रॅली होती. मात्र, त्यांची रॅली ही ‘व्होट बचाव’ रॅली नव्हती, तर घुसखोरांना वाचवा अशी रॅली होती”, अशी टीका अमित शाह यांनी केली.
‘मतदार यादीतील घुसखोरांना काँग्रेस संरक्षण देतंय’
“एसआयआरला विरोध करून काँग्रेस पक्ष देशाच्या मतदार याद्यांमधील बांगलादेशी घुसखोरांना वाचवू इच्छित आहे. मी आज येथे हे सांगायला आलोय की, राहुलजी आणि रेवंत रेड्डीजी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी भाजपा पक्ष हे सुनिश्चित करेल की प्रत्येक घुसखोराला मतदार यादीतून काढून टाकलं जाईल आणि त्यांना देशाबाहेर हाकलून दिलं जाईल. संपूर्ण काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष एसआयआरला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण हे घुसखोर त्यांची ‘व्होट बँक’ आहेत. मात्र, आम्ही एसआयआरच्या बाजूने ठामपणे उभे आहोत. केवळ या देशाचे नागरिकच येथे मतदान करू शकतील”, अशी टीका अमित शाह यांनी केली.
“काँग्रेस पक्ष बोगस मतदानाच्या माध्यमातून निवडणुका जिंकू इच्छित आहे. जर एका व्यक्तीची दोन मते असतील, तर त्यापैकी एक मत रद्द व्हायला हवं की नको? आता राहुल बाबा यांच्या पोटदुखीचं मूळ कारण समोर आलं आहे. तीन कोटी मतं अशी आहेत, ज्यांच्या नावावर ती नोंदवली गेली आहेत, असे लोक अस्तित्वातच नाहीत. हे बांगलादेशी घुसखोर आहेत”, असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
