Amit Shah vs Mamata Banerjee West Bengal: आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोलकात्यात एका विशेष कार्यक्रमात शाह यांनी राज्य सरकारवर १४ गंभीर आरोप असलेले ‘आरोपपत्र’ प्रसिद्ध केले. “ममता बॅनर्जी नेहमीच ‘व्हिक्टीम कार्ड’ खेळत आल्या आहेत, पण आता त्याचा शेवट होत आहे,” अशा शब्दांत त्यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली.
आरोपपत्र पक्षाबद्दल नाही, तर जनतेच्या समस्यांबद्दल!
अमित शाह म्हणाले की, हे आरोपपत्र केवळ राजकीय विरोधासाठी नसून ममता बॅनर्जींच्या १५ वर्षांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराचा आणि अराजकतेचा आरसा आहे. “बंगालच्या जनतेने आता ठरवायचे आहे की त्यांना भीतीचे राजकारण हवे की विकासाचा विश्वास? बंगालमध्ये सध्या केवळ भ्रष्टाचार आणि भेदभाव माजला आहे,” असे शाह यांनी स्पष्ट केले.
“बंगाल म्हणजे औद्योगिक स्मशानभूमी”
ममता सरकारवर हल्लाबोल करताना शाह यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले की, “एकेकाळी उद्योगांचे केंद्र असलेला बंगाल आता ‘औद्योगिक स्मशानभूमी’ झाला आहे. लाळघोटेपणा हे या सरकारचे ध्येय असून, सिंडिकेट्सवर कोणतीही कारवाई होत नाही.” तसेच, देशात पश्चिम बंगाल हे एकमेव असे राज्य आहे जिथून घुसखोरीचा मार्ग उघडा आहे, ज्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली.
घुसखोरी आणि भीतीतून मुक्तीची निवडणूक
आगामी निवडणुकांचा उल्लेख करताना शाह म्हणाले की, “ही निवडणूक केवळ सत्तांतरासाठी नाही, तर आपल्याच भूमीवर अल्पसंख्याक बनण्याच्या भीतीतून मुक्तता मिळवण्यासाठी आहे. भाजप कार्यकर्ते जनतेपर्यंत पोहोचले असून, आता बंगालची जनता टीएमसीच्या अराजकतेचा अंत करण्यास तयार आहे.” देशाची सुरक्षा बंगालच्या निवडणुकीशी जोडलेली असून, भाजपने आपली पकड मजबूत केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
या आरोपपत्रामुळे बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आता तृणमूल काँग्रेस याला काय प्रत्युत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
