पीटीआय, लेह
लडाख ही धर्माची जिवंत भूमी आहे. या भूमिने बौद्ध ज्ञानाचे जतन आणि संवर्धन केले. शांतता, करूणा आणि मध्यम मार्गाचा संदेश हा आजच्या काळात अडीच हजार वर्षांपूर्वीपेक्षा ही अधिक महत्त्वाचा ठरतो, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. लेहमधील लिवेत्सल येथे बुद्ध पौर्णिमा तसेच तथागत बुद्धांच्या पवित्र अवशेष प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
गृहमंत्री शहा म्हणाले, ही भूमी केवळ भौगोलिक नाही तर बौद्ध संस्कृती आणि करूणेची एक जिवंत प्रयोगशाळा आहे, असे दलाई लामा नेहमी म्हणतात. या भूमीने ज्ञानाचे जतन आणि संवर्धन केले आहे. जेव्हा जेव्हा बौद्ध धर्मावर संकट आले तेव्हा या भूमीने बुद्धांच्या शिकवणीचे संरक्षण केल्याचे ते म्हणाले. शाह म्हणाले की, आध्यात्मिक साधनेशिवाय ज्ञान अपूर्ण आहे. आध्यात्मिक साधना आणि ज्ञान यांचा संगम हा योग्य मार्ग आहे. ज्ञानी जीवनाचा पाया नैतिक शिस्त असल्याचेही ते म्हणाले.
शहा यांच्या घोषणा
– लडाख आणि कारगिलमध्ये दुग्ध क्षेत्राचा विस्तार करण्यात येणार असून लेहजवळ प्रतिदिन ५० हजार लिटर क्षमतेचा दूध प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
– लडाख आणि कारगिलमध्ये सुमारे ४ कोटी रुपयांच्या खर्चाने पशुपालन प्रजनन केंद्रे स्थापन करणार.
– पुढील १० वर्षांत पशुधन संख्या तिप्पट करण्याची योजना.
– गुणवत्ता नियंत्रण सुधारण्यासाठी मोबाइल दूध तपासणी सुविधा सुरू करणार असून खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी डिजिटल ऑटोमेटेड मिल्क कलेक्शन सिस्टम (एएमसीएस) सुरू करणार.
