लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील नक्षलवाद नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा करताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, नक्षलवादाची वाढ ही विकासाशी निगडीत प्रश्नांमुळे नव्हे तर डाव्या विचारसरणीमुळे झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नक्षवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या डाव्यांची मदत घेण्यासही मागेपुढे पाहिले नाही, असा गंभीर आरोप सोमवारी लोकसभेत केला. ‘नक्षलमुक्त भारत’ या विषयावर सभागृहात झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना, नक्षलवाद संपुष्टात न येण्यामागे काँग्रेस व डावे पक्ष कारणीभूत असल्याची टीका केली.
लोकसभेत चर्चेदरम्यान काही विरोधी नेत्यांनी भगतसिंग व बिरसा मुंडा यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांची तसेच आदिवासी नेत्यांची तुलना नक्षलवादी नेत्यांशी केली. त्यावर शहांनी संताप व्यक्त केला. नक्षलवादी गटांचा आदर्श सुभाषचंद्र बोस किंवा आदिवासींच्या प्रतिकार चळवळीतील देशी नेते नव्हते. त्याऐवजी त्यांनी माओ त्से-तुंग यांच्यासारख्या परदेशी क्रांतिकारक नेत्यांचे अनुकरण केले. त्यामुळे नक्षलवाद्यांची तुलना स्वातंत्र्यसैनिकांशी वा स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांशी करणे गैर ठरते, असे शहा म्हणाले. देशात १९७०च्या दशकातील डाव्या वैचारिक प्रभावांमध्ये नक्षलवादाची मुळे रुजली. डाव्या विचारसरणीने नक्षलींच्या सशस्त्र चळवळीला बळ दिले. या चळवळींनी लोकशाही प्रक्रियाच नाकारली. नक्षलवादी केवळ गरिबीमुळे निर्माण झाले नाहीत, तर त्यांनी संसदीय लोकशाहीलाच विरोध केला, अशी तीव्र टीका शहांनी केली.
छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि महाराष्ट्र या नक्षलवादी प्रभाव असलेल्या राज्यांमधील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली होती, त्याचा परिणाम तिथल्या सुमारे १२ कोटी लोकांवर झाला. दशकानुदशके चाललेल्या या संघर्षात सुमारे २० हजार तरुणांना जीव गमवावा लागला, असे शहा म्हणाले.
नक्षलवादाला नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगत शहा यांनी, नक्षलवाद आटोक्यात आल्याचे श्रेय केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य पोलीस आणि स्थानिक आदिवासी यांच्या एकत्रित प्रयत्नांना दिले.
काश्मीर व ईशान्य भारताशी विभाजनवादी समस्येपेक्षाही नक्षलवाद अधिक गंभीर व चिंताजनक असल्याची कबुली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली होती. मग, त्या काळात काँग्रेसच्या सरकारने नक्षलवादाविरोधात निर्णायक कारवाई का केली नाही? काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नक्षलवादी विचारसरणीशी सहानुभूती बाळगणाऱ्या व्यक्तींबरोबर एकाच व्यासपीठावर उपस्थित राहतात. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
काँग्रेस लक्ष्य
नक्षलवाद्यांबद्दल सहानुभूती बाळगतात काँग्रेसला १९७० नंतरच्या दशकांमध्ये हा प्रश्न का सोडवता आला नाही, असा प्रश्न शहांनी उपस्थित केला. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांपैकी जवळपास ६० वर्षे काँग्रेस पक्ष सत्तेवर होता, तरीही आदिवासीबहुल प्रदेश अविकसित राहिले, असा आरोप काँग्रेसवर करत, या भागांमध्ये विकासाला खऱ्या अर्थाने गती २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मिळाली, असा दावा शहांनी केला.
