Amit Shah Lok Sabha Naxalism Speech: “हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे. जो कोणी शस्त्र उचलेल, त्याला परिणामांना सामोरे जावे लागेल. गोळीचे उत्तर गोळीनेच मिळणार”, असे गृहमंत्री अमित शाह लोकसभेत नक्षलवादावर बोलताना म्हणाले. “चर्चा करण्यासाठी तयार असणाऱ्यांबरोबर चर्चा करायला हवी आणि जे गोळीची भाषा करतील त्यांना गोळीच मारायला हवी”, असे परखड मत शाह यांनी मांडले. ७० वर्षांपैकी ६० वर्षे काँग्रेसने राज्य केले. मग विकास का झाला नाही? तुम्ही विकास का केला नाही? असा सवालही शाह यांनी यावेळी उपस्थित केला.

बस्तरमधून नक्षलवाद हद्दपार – अमित शाह

अमित शाह लोकसभेत नक्षलवादावर बोलत आहेत. या चर्चेबद्दल रेड कॉरिडॉरमधील १२ राज्ये आणि आदिवासी समुदायांच्या वतीने शाह यांनी आभार मानले. “बस्तरमधून नक्षलवाद आता जवळजवळ संपुष्टात आला आहे. बस्तरमधील प्रत्येक गावात शाळा बांधण्याची मोहीम सुरू करण्यात आली. बस्तरमधील प्रत्येक गावात शिधावाटपाची दुकाने उघडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहेत”, असे शाह म्हणाले. “नक्षलवादाचे मूळ कारण विकासाची मागणी नसून एक विचारसरणी असून, इंदिरा गांधींनी राष्ट्रपती निवडणुकीमुळे ती स्वीकारली होती”, असे शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

काय म्हणाले अमित शाह?

अमित शाह यांनी यावेळी ऑपरेशन बुद्धा, ऑपरेशन थंडरस्टॉर्म आणि ऑपरेशन भीमबांधा यांचा उल्लेख केला. सर्व भाग नक्षलवाद्यांपासून मुक्त करण्यात आल्याचे देखील शाह म्हणाले. २१ दिवस चाललेल्या ब्लॅक फॉरेस्ट मोहिमेत सर्व शस्त्रे जप्त केली. यामुळे छत्तीसगड, तेलंगणा आणि ओडिशामधील नक्षलवादी चळवळ संपुष्टात आली. मी अत्यंत विनम्रतेने कोब्रा, छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफला सलाम करतो, असे शाह लोकसभे बोलताना म्हणाले. शाह यांनी बसवराजू ते हिडमा यांच्यापर्यंतच्या ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे सभागृहात वाचून दाखवली. तसेच, वेणुगोपाल, वासुदेव, पल्लुरी प्रसादराव चंदना आणि टिपरी तिरुपती यांनी आत्मसमर्पण केल्याचे सांगितले.

नक्षलवादाचा कालानुक्रम वाचून दाखवला

“भारतातील नक्षलवादाचा कालानुक्रमही शेअर करायचा आहे म्हणत अमित शाह यांनी ही चळवळ १९६९ मध्ये बंगालमधील नक्षलबाडी येथे सुरू झाल्याचे सांगितले. १९८० च्या दशकापर्यंत ती तीन राज्यांमध्ये पसरली. १९९० च्या दशकापर्यंत येथेही विलीनीकरण सुरू झाले. २००४ मध्ये, दोन गट विलीन होऊन सीपीआय (माओवादी) ची स्थापना झाली. २००० ते २००४ ही चार वर्षे वगळता, काँग्रेस पक्ष सत्तेत होता, असे अमित शाह म्हणाले.

१९७० मध्ये ‘सद्सद्विवेकबुद्धीनुसार मतदान करा’ अशी घोषणा तयार करण्यात आली.” इंदिरा गांधींनी संजीव रेड्डी यांच्या विरोधात उमेदवार उभा केला. आपल्या पक्षात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, इंदिरा गांधींनी माओवाद्यांचा पाठिंबा मिळवला. सत्तेवर येईपर्यंत त्या माओवादी विचारसरणीच्या प्रभावाखाली होत्या. हा तो काळ होता जेव्हा माओवादाचा प्रसार झाला, असेही शाह सभागृहात बोलताना म्हणाले.