Amit Shah On Rahul Gandhi : आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलेलं आहे. तसेच गॅसचा साठा पुरेसा उपलब्ध असल्याचा दावाही केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून केला जात आहे.

पण LPG गॅस सिलिंडरसाठी काही शहरांत नागरिकांच्या रांगा लागल्याचा आरोप करत विरोधकांनी नुकतंच संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून आंदोलन केलं होतं. या आंदोलनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील सहभागी झाले होते. मात्र, या आंदोलनावेळी राहुल गांधी यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांनी संसदेच्या प्रवेशद्वारावरच बसून चहा-बिस्किट खाल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला. यावरूनच सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांनी विरोधकांवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज आसामच्या दौऱ्यावर होते. यावेळी गुवाहाटी येथील एका सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. ‘राहुल गांधी संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चहा-बिस्किट खातात, पकोडे खातात. मात्र, अशा कृती संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का देतात. ज्याचं वर्णन आपण भारतीय लोकशाहीची सर्वोच्च संस्था म्हणून करतो’, असं म्हणत अमित शाहांनी विरोधकांवर निशाणा साधला.

अमित शाह म्हणाले की, “कधीकधी ते (राहुल गांधी) संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चहा आणि पकोडे खातात. नाश्ता करण्यासाठी योग्य जागा कोणती हे त्यांना कळत नाही का? संसद ही आपल्या लोकशाहीची सर्वोच्च संस्था आहे. तिथे बसून निषेध करणं ही लोकशाही पद्धत नाही. मात्र, तुम्ही निषेध करण्यापेक्षा दोन पावलं पुढे गेला आहात. तुम्ही त्या ठिकाणी चहा आणि पकोडे खात आहात. त्यामुळे जगभरात भारताची बदनामी होतेय”, अशी टीका अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.