अमित शहांचे केंद्रीय मंत्र्यांना आदेश; कार्यकर्त्यांना भेटण्याचे फर्मान
भाजप अध्यक्षपदाची दुसरी कारकीर्द सुरू होताच अमित शहा यांनी केंद्रीय मंत्र्यांना कामाला लावले आहे. केंद्र सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक केंद्रीय मंत्र्यास शहा यांनी दोन जिल्ह्य़ांचा दौरा करण्याचे फर्मान काढले आहे. प्रवासादरम्यान शासकीय कामांचे उद्घाटन, कार्यकर्त्यांच्या भेटींवर भर देण्याची सूचना करण्यात आली आहे. काहीही झाले तरी जिल्हास्थानी मुक्काम ठोकून किमान ३० तास वेळ देण्याची विशेष सूचना शहा यांनी केली आहे. भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या स्वाक्षरीचे पत्र २० दिवसांपूर्वीच मंत्र्यांना पाठवण्यात आले होते. त्यानंतरही प्रवास न केलेल्या ११ केंद्रीय मंत्र्यांना आता शहा हेच बैठकीदरम्यान ‘समज’ देणार आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान दिवसभर प्रचार करून मुक्काम न करता रात्री आपापल्या गृहराज्यात परतणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांची शहा कानउघाडणी केली होती. एवढेच नव्हे तर हेलिकॉप्टर सेवा पुरवणाऱ्या एका यादववंशीय व्यापाऱ्याला मंत्री व भाजप नेत्यांना केवळ निश्चित ठिकाणी सोडून परतण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मंत्र्यांना प्रचारानंतर मुक्काम केल्याशिवाय पर्यायच उरत नसे. आता निवडणुकीची धामधूम नसताना शहा यांनी मंत्र्यांना कामाला लावले आहे. मंत्र्यांना निवासी प्रवास करण्याची तंबी देण्यात आली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढमधील आदिवासीबहुल जिल्ह्य़ांमध्ये संबंधित खात्याच्या राज्यमंत्र्यांची पाठवणी शहा यांनी केली होती.
विशेष म्हणजे मंत्र्यांना ३० तास एका जिल्ह्य़ात घालविण्याचा निर्णय पक्षस्तरावरून घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत केंद्रीय मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेत आहेत. सत्तास्थापनेपासून दुसऱ्यांदा २७ जानेवारीला मोदी यांनी संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. एरव्ही केंद्रीय मंत्री व स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्रीच या बैठकीत सहभागी होत असत. परंतु २७ जानेवारीच्या बैठकीत मोदी यांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांकडूनदेखील माहिती विचारली. त्यांच्या कामकाजाची चौकशी केली. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ बदलाची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

* प्रत्येक मंत्र्याकडून शहा माहिती घेणार आहेत. केंद्राने त्या-त्या राज्यासाठी मंजूर केलेली विकासकामे तसेच जिल्हास्थानी झालेल्या विकासकामांची यादीच स्थानिक खासदाराकडून मंत्री घेतात. त्यानंतर मंत्री व खासदार एकत्रितपणे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांना उपस्थिती लावतात.
* केंद्रीय मंत्री वादग्रस्त विधानांमध्ये जास्त काळ चर्चेत राहिल्याने शहा यांनी आता ही शक्कल लढवली आहे.