पीटीआय, मोगा (पंजाब)

पंजाबमधील सरकार हे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी ‘एटीएम’ मशीन बनले आहे. निवडणुकीत मतदारांनी भाजपला संधी दिल्यास राज्यात बदल घडवून आणू. पंजाबला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त केवळ नरेंद्र मोदी आणि भाजपच करू शकते. २०२७ ला सत्तेत आल्यास अमली पदार्थांचा व्यापार संपवू, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले.

पंजाबमधील मोगा येथे ‘बदल’रॅलीत ते बोलत होते. या वेळी त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. गृहमंत्री शहा म्हणाले, ‘आज कर्जाचा बोजा, अमली पदार्थ, धर्मांतर, भ्रष्टाचार आणि गँगस्टरांच्या दहशतीमुळे पंजाबचे मोठे नुकसान झाले आहे,’ असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री मान हे केवळ केजरीवाल यांचे ‘पायलट’ म्हणून काम करत असल्याची टीकाही शहा यांनी केली.

शहा म्हणाले, ‘भगवंत मान सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. दिल्लीहून आलेले चार ‘सुभेदार’ येथे बसून राज्याची संपत्ती बाहेर पाठवत आहेत. पंजाबचे सरकार पंजाबच्या सन्मानाशी खेळत आहे. भाजपला एक संधी द्या, आम्ही पंजाबमध्ये बदल घडवून आणू, असे सांगत शहा म्हणाले की २०२७ च्या निवडणुकीसाठी पक्षाने मोगा येथूनच प्रचाराला सुरुवात केल्यासारखे असल्याचे ते म्हणाले.

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्याचा उल्लेख करत शहा म्हणाले, दहशतवाद आता शेवटचा श्वास घेत आहे आणि नक्षलवादही संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. पंजाबच्या तरुणांना बेरोजगारीतून मुक्त व्हायचे असेल तर काँग्रेस, अकाली दल आणि आपने अनेक संधी घेतल्या; आता एक संधी भाजपला द्या, आम्ही पंजाबमध्ये बदल घडवू, असे आवाहन शहा यांनी केले.

कोट पंजाबमध्ये प्रत्यक्षात सरकारच नाही. सरकार असते तर कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती इतकी बिघडली नसती, राज्य अमली पदार्थांच्या संकटात सापडले नसते आणि शेतकऱ्यांना एवढ्या अडचणींना सामोरे जावे लागले नसते. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री