Amit Shah Rahul Gandhi Special Parliament Session: मतचोरीच्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यास भाजपा तयार आहे. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यास कधीच तयार होणार नाहीत, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. राहुल गांधी संसदेत चर्चा करण्याऐवजी रस्त्यावर गोंधळ घालतील, असा टोलाही त्यांनी लगावला. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे शुक्रवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शाह बोलत होते. “मतचोरीच्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यास मी तयार आहे. मात्र, राहुल बाबा कधीच यासाठी सहमत होणार नाहीत. ते संसदेत या विषयावर चर्चा करणार नाहीत, तर रस्त्यावर गोंधळ घालतील,” असे शाह म्हणाले.
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांचे आंदोलन
अमित शाह यांची ही टीका विरोधकांच्या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात शनिवारी ‘जनतेकडून महाभियोग’ आंदोलन करण्याची विरोधकांची योजना आहे. तसेच, लोकशाहीच्या कथित ऱ्हासाविरोधात रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर मोठ्या आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
इंडिया आघाडीने शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ‘जनतेकडून महाभियोग’ आंदोलन करण्याचे नियोजन केले होते. मात्र, अवकाळी पावसामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरूनही विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका तीव्र केली आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने सत्ताधारी भाजपाला फायदा व्हावा, या उद्देशाने मतदार यादीतून मतदारांची नावे कमी करण्याची मोहीम राबवल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
‘निवडणूक हरल्यानंतर पंचांनाच दोष देतात’
लखनौ येथील भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील पक्षाच्या यशाचा उल्लेख करत काँग्रेस व समाजवादी पक्षावर टीका केली. अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षांना सत्तेवर आणता आलेले नाही, अशी टीका शाह यांनी केली. समाजवादी पक्षाने शेवटची विधानसभा निवडणूक अखिलेश यादव यांचे वडील आणि पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या हयातीत जिंकली होती, असे ते म्हणाले.
“तुम्ही स्वतःच्या ताकदीवर एकही निवडणूक जिंकलेली नाही. राहुल बाबांच्या बाबतीतही तेच आहे,” असे शाह यांनी म्हटले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधक पंचांनाच दोष देतात आणि मतचोरीचे आरोप करतात, अशी टीका करत “सामना हरल्यानंतर आता ते पंचांवर आरोप करत आहेत,” असेही ते म्हणाले.
