Amit Shah Ready For NEET Student Debate: नीटच्या विद्यार्थी आंदोलनाशी निगडीत सर्व प्रकारची चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले. सगळ्या गोष्टींची उत्तरं दिली जातील सरकारकडे लपवण्यासारखे काही नाही, असेही शाहांनी संसद परिसरात बोलताना सांगितले. आज दुपारी तीन ते उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे सांगत विरोधकांनी दोन वाजेपर्यंत लोकसभा अध्यक्षांना पत्र द्यावे, असे आवाहन शाहांनी केले. गुरुवारी दुपारी तीन वाजता सर्व प्रश्नांवर उत्तर दिली जातील, असे शाहांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले अमित शाह?
“बेपत्ता, पळून गेले, घाबरले आहेत अशा प्रकारची भाषा भारताच्या सार्वजनिक जीवनात आणि संसदीय कामकाजात अलिकडे ऐकायला मिळत आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून मी संसदेत येतोय, माझ्या दालनात बसलोय. विरोधक दोन्ही सभागृह चालूच देत नाहीयेत, मग जाऊन काय करायचं? नीटच्या विद्यार्थी आंदोलनाशी निगडीत सर्व प्रकारची चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलंय. आम्ही आता वेळ निश्चित करा असं सांगितलंय, हीच तर त्यांची मागणी होती, मी देखील स्पष्ट केलंय की, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तयार आहे. पण, त्यांना चर्चाच होऊ द्यायची नाही, अता कोण पळून जातंय हे जनतेने ठरवावे”, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
दोन वाजेपर्यंत अध्यक्षांना पत्र देण्याचे आवाहन
“विरोधकांनी आज दुपारी दोन वाजेपर्यंत अध्यक्षांना पत्र द्यावे आज तीनपासून उद्या तीनपर्यंत चर्चा करावी, मी सभागृहातच आहे. सगळ्यांना ऐकून घेईन, आणि सगळ्या गोष्टींची उत्तरं देईन, सरकारकडे लपवण्यासारखे काहीही नाही. मोदी सरकार सर्व प्रकारची चर्चा करण्यासाठी तयार आहे, फक्त कामकाज चालू द्यावे”, असे आवाहन गृहमंत्री शाहांनी केले. “विरोधकांनी दोन वाजेपर्यंत अध्यक्षांना पत्र द्यावे चर्चा करावी आणि उद्या तीन वाजता मी उत्तर देईन”, असे शाह म्हणाले. “मला कोणीतरी या विषयावर वक्तव्य करण्यासाठी सांगतं पण एवढ्या गंभीर विषयावर अशा प्रकारे चर्चा होऊ शकत नाही”, असेही शाह म्हणाले.
चर्चा करण्यासाठी तयार – शाह
“देशातील जनतेच्या समोर सगळ्या गोष्टी स्पष्ट व्हाव्यात, दूध का दूध और पाणी का पाणी हो जाए. मी स्वत: सभागृहात बसून चर्चा करण्यासाठी तयार आहे, आता विरोधकांनी त्यांना चर्चा हवी का गोंधळ हे ठरवावे”, असे शाह म्हणाले.
