केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २०२४ पर्यंत ईशान्य भारतातील सर्व प्रश्न सोडवणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. ते हैदराबादमधील भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत राजकीय विषयांवर बोलत होते. याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. अमित शाह यांनी ईशान्य भारतात आता आगामी काळात कोणतेही प्रश्न राहणार नाहीत, असंही सांगितल्याचं शर्मा यांनी नमूद केलं. ते रविवारी (३ जुलै) हैदराबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

हिमंता बिस्वा शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह म्हणाले, “२०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर ईशान्य भारतात विकास कामांना गती मिळाली आहे. ईशान्य भारतातील ६० टक्के भागातून अफ्स्पा कायदा (AFSPA Act) हटवण्यात आला आहे. केंद्र सरकारने नागालँडमधील ७ जिल्ह्यांमधील १५ पोलीस स्टेशनच्या परिसरातून अफ्स्पा कायदा हटवला आहे. मणिपूरच्या ६ जिल्ह्यातील १५ पोलीस स्टेशनच्या भागातूनही अफ्स्पा हटवला आहे. याशिवाय आसाममधील २३ जिल्ह्यांमधून पूर्णपणे आणि एका जिल्ह्यातून काही प्रमाणात हा कायदा हटवला. आगामी काळात या भागात कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही.”

“मोदींविरोधात केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालं”

अमित शाह यांनी गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचं मत व्यक्त केलं. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचं या निर्णयाने सिद्ध केलं. हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित होते, असाही आरोप अमित शाह यांनी केला.

“गांधी कुटुंब भीतीमुळे अध्यक्षपदाची निवडणूक देखील घेत नाही”

अमित शाह म्हणाले, “विरोधी पक्ष विखुरलेला आहे. काँग्रेस पक्षात लोकशाही आणण्यासाठी त्या पक्षाचे सदस्यच लढाई लढत आहेत. गांधी कुटुंब भीतीमुळे अध्यक्षपदाची निवडणूक देखील घेत नाहीये. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकचा विरोध, कलम ३७० हटवण्याचा विरोध, जीएसटीचा (GST) विरोध, आयुष्मान भारत योजनेचा विरोध, लस व लसीकरणाचा विरोध, सीएएचा (CAA) विरोध, राम मंदिराला विरोध यातून काँग्रस प्रत्येक विषयात केवळ विरोधत करत असल्याचं दिसतं.”

“काँग्रेस देशहिताच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करत आहे”

“काँग्रेसला ‘मोदी फोबिया’ झाला आहे. काँग्रेस देशहिताच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करत आहे. काँग्रेस पूर्णपणे हतबल व निराश झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात दोन राष्ट्रपतींच्या निवडणुका झाल्या. भाजपाने एकदा दलित आणि दुसऱ्यादा एका आदिवासी महिलेला निवडलं. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाबाहेरील व देशांतर्गत सुरक्षा मजबूत झाली आहे. संरक्षण क्षेत्रात व्यापक सुधारणा होत आहेत. कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग करण्यात आलं आहे,” असं अमित शाह यांनी सांगितलं.

हेही वाचा : विश्लेषण : ६९ जणांचा मृत्यू, ३० जण अजूनही बेपत्ता, दोषी जामिनावर बाहेर; गुलबर्ग सोसायटी हत्याकांडात नेमकं काय घडलं?

“स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे तीन प्रमुख भाग आहेत. यात सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करणे, सर्व सरकारांनी आपल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवणे आणि स्वातंत्र्याच्या अमृतकाळात सर्वांना भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू करण्याचा संकल्प करणे,” असंही शाह यांनी नमूद केलं.