नवी दिल्ली : काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीला घुसखोरांच्या जिवावर निवडणुका जिंकायच्या आहेत. म्हणून ते मतदार फेरआढावा मोहिमेला (एसआयआर) विरोध करत आहेत. मतपेट्यांची लूट करून निवडणुका जिंकता येत नाहीत म्हणून मतदान यंत्रांवर आक्षेप घेत आहेत. भाजप कधीही मतचोरी करून निवडणूक जिंकलेला नाही. मतचोरी करून निवडणुका जिंकण्याची सुरुवात तर पं. नेहरू आणि इंदिरा गांधींनी केली होती, असे घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत निवडणूक प्रक्रिया सुधारणेवरील चर्चेला उत्तर देताना केला.

विरोधकांवर घुसखोरांना पाठीशी घालण्याच्या आरोपानंतर काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या सदस्यांनी शहांच्या भाषणावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. त्याआधी, शहांच्या निवडणूक प्रक्रियेत घोटाळा होत नसल्याच्या दाव्याला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र आक्षेप घेतला. माझ्या पत्रकार परिषदेत पुराव्यासह आरोप केले असून त्यावरच इथे चर्चा केली तरी चालेल, असे राहुल गांधींनी सुचवले. त्यावर शहा संतप्त होऊन, ‘मी तुमच्या सांगण्यावरून माझे भाषण ठरवत नाही. मला जे बोलायचे आहे आणि जसे बोलायचे आहे तेच बोलणार’, असे प्रत्युत्तर दिले.

शहा आणि विरोधी सदस्यांमध्ये वारंवार झालेल्या खडाजंगीनंतर विरोधकांनी सभात्याग केला. आम्ही पं. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधींवर टीका केली तरी काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला नव्हता. त्यांच्यावरील टीकाही त्यांनी सहन केली पण, घुसखोरांचा मुद्दा काढल्यानंतर लगेचच त्यांनी सभात्याग केला. त्यावरून त्यांना कोणाला वाचवायचे आहे उघड होते, असा प्रहार शहांनी केला. विरोधकांनी २०० वेळा आमच्यावर बहिष्कार केला तरी चालेल पण, एकाही घुसखोराला देशात राहू दिले जाणार नाही असे शहा म्हणाले.

हेही वाचा

मतचोरी करणारे पहिले कोण?

राहुल गांधी भाजपवर मतचोरीचा बिनबुडाचा आरोप करत आहेत. पण, पहिली मतचोरी कोणी केली होती, असा सवाल करत शहा यांनी नेहरू व इंदिरा गांधींवर थेट आरोप केला. स्वातंत्र्यापूर्वी, काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये सरदार पटेल यांना जवाहरलाल नेहरूंपेक्षा जास्त मते मिळाली होती, तरी नेहरू पंतप्रधान झाले होते. ही मतचोरीच होती. इंदिरा गांधीची रायबरेलीतील निवडणूक अवैध ठरली. योग्य पद्धतीने निवडणूक लढवलेली नाही असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. पण, पंतप्रधानांविरोधात गुन्हाच असू शकत नाही असा कायदा केला गेला. इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदाला संरक्षण दिले त्याचे उत्तर तुम्ही देणार का? चौथ्या क्रमांकावरील न्यायाधीशाला सरन्यायाधीश केले गेले आणि या प्रकरणातून स्वत:ला मुक्तही केले. ही मतचोरी नव्हे का? ‘मतचोरी’चे तिसरे उदाहरण म्हणजे, जो पात्र नाही त्याने मतदान करणे. सोनिया गांधी देशाची नागरिक होण्याआधी मतदार बनल्या. हा वाद न्यायप्रविष्ट आहे. हीदेखील मतचोरी ठरते, अशी प्रखर टीका शहांनी केली. आता उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी विरोधात निकाल दिला म्हणून त्यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा पक्षही सहभागी झाला आहे, अशीही टीका शहांनी केली.

‘एसआयआर’ला विरोध केला तर हराल

आम्ही मतचोरी करून जिंकलेलो नाही. लोक आम्हाला जिंकून देतात. ‘एसआयआर’चा विरोध केला तर पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्येही हराल. जनतेचा निर्णय देवाचा निर्णय असतो. त्यावर विरोधक मतचोरीचा आरोप करत आहेत. तुम्ही लक्ष्यभेदी हल्ल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तुम्ही हरलात; राम मंदिराला विरोध केला, तुम्ही हरलात. मी तुम्हाला पुन्हा एकदा इशारा देतो की, जर तुम्ही एसआयआरला विरोध करत राहिलात तर तुम्ही पुन्हा हराल, असा हल्लाबोल शहांनी केला.

केंद्रीय आस्थापनांमध्ये संघाच्या विचारांचे लोक आले तर तुम्ही आक्षेप का घेता? इंदिरा गांधींनी डाव्या विचारांच्या लोकांना संस्था ताब्यात घेऊ दिल्या. डावी विचारसरणी देश स्वीकारत नाही. राष्ट्रासाठी सर्वोच्च त्याग करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आहे. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री