मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या विरोधात मागील काही दिवसांपासून विरोधक आंदोलन करत आहेत. विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी दिल्लीत इंडिया आघाडी, कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आता काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली.

यावेळी बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही दिला आहे. आत्मपरीक्षण करा, एसआयआरला दोष देऊ नका. गुजरातमध्ये काँग्रेस ४१ वर्षांपासून जिंकलेली नाही. मग हा एसआयआरचा परिणाम आहे का?’, असा सवाल अमित शाह यांनी केला आहे.

अमित शाह काय म्हणाले?

“गुजरातमध्ये आज तीन नगरपालिका आणि महानगरपालिकांची निवडणूक पार पडली. या दोन नगरपालिका आणि एका महापालिकेतील एकूण १०४ जागांपैकी ९० जागा जिंकत भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. माझ्या मतदारसंघांत येणाऱ्या गांधीनगर महानगरपालिकेत भाजपाने ४४ पैकी ३८ जागा जिंकल्या आहेत, तर आम आदमी पक्षाने ३२ जागांवर निवडणूक लढवली होती. पण त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यामुळे हा विजय राज्याच्या मतदारांचा कौल दर्शवतो”, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

‘गुजरातमध्ये काँग्रेसने ४१ वर्षांपासून एकही निवडणूक जिंकली नाही’

“गुजरातचे मतदार पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत गांधीनगर महापालिकेत भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मला एक गोष्ट विशेषतः राहुल गांधींना सांगायची आहे की काँग्रेस पक्षाने गेल्या ४१ वर्षांत एकही निवडणूक जिंकलेली नाही. काँग्रेसने गुजरातमध्ये जिंकलेली शेवटची निवडणूक १९८५ मध्ये होती. तेव्हापासून काँग्रेसला गुजरातमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे”, अशी टीका अमित शाह यांनी केली.

‘राहुल गांधींना आत्मपरीक्षण करण्याची गरज’ : अमित शाह

“राहुल गांधी यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ज्या मोठ्या राज्यात तुमची एकेकाळी सत्ता होती, तिथे गेल्या ४१ वर्षांत तुम्ही एकही निवडणूक जिंकू शकलेले नाहीत. त्यामुळे याबाबत तुम्ही गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आताच तीन राज्यांत पोटनिवडणुका झाल्या. पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही”, अशी टीका अमित शाह यांनी केली.

“गेल्या ३३ वर्षांत त्रिपुरामध्ये काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री निवडून आला नाही. बंगालमध्ये काँग्रेसला ५४ वर्षांपासून विजय मिळवता आला नाही. बंगाल, त्रिपुरा आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला तीन, चार किंवा पाच दशकांपासून पराभवाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे मला राहुल गांधींना विचारायचं आहे की हा एसआयआर चा परिणाम आहे का? एसआयआर तर २०२४ नंतर लागू झाला. जेव्हापासून तुम्ही काँग्रेसचे प्रमुख नेते आणि विरोधी पक्षनेते झाला तेव्हापासून काँग्रेसचा प्रत्येक निवडणुकीमध्ये पराभव होत आहे”, अशी टीका अमित शाह यांनी केली.