केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना २ ऑगस्टला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर रविवारी (९ ऑगस्ट) अमित शाह करोनामुक्त झाले असल्याची माहिती भाजपा नेते मनोज तिवारी यांनी ट्विट करत दिली. पण काही वेळातच त्यांनी ते ट्विट डिलीट केल्याने अमित शाह करोनामुक्त की अद्याप करोनाग्रस्त याबाबतचा संभ्रम कायम आहे.

२ ऑगस्टला अमित शाह यांनी करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. मात्र आज (९ ऑगस्ट) त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे तिवारी यांनी सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी केलेल्या ट्विटमध्ये सांगितलं. पण अवघ्या तासाभरातच त्यांनी ते ट्विट डिलीट करून टाकलं. तसंच, अमित शाह यांची करोना नव्याने कोणतीही करोना चाचणी झालेली नसल्याचेही गृहमंत्रालयाने स्पष्ट केले. त्यामुळे अमित शाह करोनामुक्त झाले आहेत की नाहीत याबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे.

डिलीट केलेलं ट्विट-

अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत २ ऑगस्टला माहिती दिली होती. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं होतं. अमित शाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहितीही दिली होती. त्यामुसार अमित शाह एम्स रुग्णालयात दाखल झाले होते.

अमित शाह हे गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या कॅबिनेट बैठकीत उपस्थित होते. मात्र त्या बैठकीत सोशल डिन्स्टसिंगचे पालन करण्यात आले होते असे सूत्रांनी आयएअनएसला सांगितले. तसेच बैठकीत साऱ्यांनीच मास्क लावले होते. शाह यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संवाद मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून गृह विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला होता.