पोर्ट ब्लेअर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती आणि त्यांचा त्याग, शौर्य याबद्दल शंका घेता येणार नाही आणि जे त्याबद्दल प्रश्न उपस्थित करतात त्यांना त्याची थोडी तरी लाज वाटली पाहिजे, या शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सावरकरविरोधकांवर टीकेची तोफ डागली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे शुक्रवारी येथे तीन दिवसांच्या अंदमान-निकोबार दौऱ्यासाठी आगमन झाले. त्यांनी राष्ट्रीय स्मारक सेल्युलर कारागृहास भेट देऊन हुतात्मा स्तंभ येथे पुष्पचक्र अर्पण केले. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी बंदीवास भोगलेल्या कोठडीस भेट देऊन सावरकरांना श्रद्धांजली वाहिली.

त्यानंतर शहा म्हणाले की, सावरकरांना वीर ही उपाधि कोणत्याही सरकारने दिलेली नाही, तर देशातील १३० कोटी लोकांनी त्यांना ती त्यांच्या देशप्रेम, शौर्याबद्दल बहाल केली आहे. ज्यांनी देशासाठी कारावास भोगताना कोलूवर पशुवत यातना भोगत अपार घाम गाळला, ज्यांना दोन जन्मठेपा सुनावण्यात आल्या, त्यांची निष्ठा, त्यागाबद्दल तुम्ही शंका कशी घेऊ शकता, थोडी तरी लाज बाळगा, असा हल्ला शहा यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्यलढय़ातील योगदानाबद्दल शंका उपस्थित करणाऱ्यांवर चढविला.

या दौऱ्यात गृहमंत्री शहा येथील विकास योजनांचा आढावा घेणार आहेत. वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शहा यांचे आगमन होताच नायब राज्यपाल अ‍ॅडमिरल डी. के. जोशी आणि खासदार कुलदीप राय शर्मा यांनी त्यांचे स्वागत केले. या दौऱ्यात शहा हे विविध विकासकामांची हवाई पाहणी करणार आहेत. यात शहीद द्वीप इको टुरिझम प्रकल्प आणि स्वराज द्वीप जल हवाईतळ यांचा समावेश आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस बेटालाही ते भेट देणार आहेत.

अंदमान-निकोबार पोलिसांनी रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले असूून गृहमंत्री शहा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.