amit shah warning to rahul gandhi : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांनी शुक्रवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर आसामच्या वेषभूषा परंपरेचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देण्यात आलेला पारंपारिक गामोसा (Gamosa) परिधान करण्यास राहुल गांधी यांनी नकार दिल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे सध्या मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

अमित शाह म्हणाले की, “राहुल गांधी त्यांना हवे ते काहीही करू शकतात, पण जोपर्यंत भाजपा सत्तेत आहे, तोपर्यंत ईशान्येकडील राज्यांच्या संस्कृतीचा अपमान सहन केला जाणार नाही.”

आसाममधील दिब्रुगड येथे एका कार्यक्रमात बोलताना शाह यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. “विदेशी पाहुण्यांसह, इतर सर्व उपस्थितांनी सन्मानाचे प्रतिक म्हणून ते परिधान केले,” असे शाह म्हणाले. “…गांधी हे एकमेव व्यक्ती होते ज्यांनी असे करण्यास नकार दिला,” असेही शाह यावेळी म्हणाले.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी देखील राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षावर जोरदार टीका केली. “राहुल गांधी यांनी ईशान्येकडील संस्कृती… आसाम आणि ईशान्येकडील लोकांचा आदर करणे शिकले पाहिजे. अन्यथा त्यांनी मते मागू नयेत.”

ही टीका राहुल गांधी यांच्या एका फोटोवरून केली जात आहे, ज्यामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये फक्त तेच गामोसा परिधान न केलेले दिसत आहेत. या फोटोवरून शाह आणि सरमा यांनी राहुल गांधींना धारेवर धरले आङे.
काँग्रेसचे प्रत्युत्तर

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, सत्ताधारी पक्षाला खोटा प्रपोगंडा चालवून राहुल गांधी यांची प्रतिमा खराब करायची आहे, मात्र ते यशस्वी होणार नाहीत. खरगे असेही म्हणाले की, गामोसा परिधान न करणारे राहुल गांधी हे एकमेव व्यक्ती नव्हते.

“संरक्षण मंत्री (राजनाथ सिंह) यांनीही परिधान केला नव्हता…. भाजपा अध्यक्ष (नितीन नबीन) यांनी देखील तो परिधान केला नव्हता. सुरूवातीला परिधान केल्यानंतर राहुल गांधी तो हातात घेतला होता….पण ते (भाजपा) असा खोटा प्रचार करत आहेत की राहुल गांधींनी ईशान्य भारताचा अपमान केला…. या लोकांना खोट्या प्रचाराच्या माध्यमातून राहुल गांधींची प्रतिमा खराब करायची आहे… पण ते कधीच यशस्वी होणार नाहीत. मी या घटनेचा प्रत्यक्षदर्शी आहे.”

सरकारने आमचा अपमान केला; खरगेंचा आरोप

खरगे यांनी उलट भाजपावरच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्यांना तिसऱ्या ओळीत बसवून अपमान केल्याचा आरोप केला. “सरकारने गांधी आणि मला तिसर्‍या रांगेत बसवून आमचा अपमान केला… आम्हाला मुलांच्या मागे बसवण्यात आले. आम्हाला राज्य मंत्र्यांच्या बाजूला बसवण्यात आले होते. त्यांनी आमची माफी मागायला हवी,” असे खरगे म्हणाले.