Humayun Kabir Sting Operation TMC Allegations: पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणाऱ्याबरोबर युती करण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात बसणे पसंत करेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी म्हणाले. भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना कोलकाता येथील एका कार्यक्रमात अमित शाह बोलत होते. ममता बॅनर्जी यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपाने तृणमूल काँग्रेसचे माजी नेते हुमायून कबीर यांना पैसे दिल्याचा आरोप टीएमसीने केला आहे.

काय म्हणाले अमिक शाह?

तृणमूल काँग्रेसच्या आरोपावर अमित शाहांनी प्रतिक्रिया दिली आहे, “ममताजी २००० व्हिडिओ बनवू शकतात. हुमायून कबीर आणि भाजप हे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवासारखे आहेत; आम्ही कधीही एकत्र येऊ शकत नाही. जे बंगालमध्ये बाबरी मशीद बांधत आहेत, त्यांच्यासोबत भाजप कधीही युती करणार नाही; त्यापेक्षा आम्ही २० वर्षे विरोधी पक्षात बसू, अशी रोखठोक भूमिका अमित शाहांनी मांडली.

हुमायून कबीर यांचे स्टिंग ऑपरेशन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षाने हुमायून कबीर यांच्या आम जनता उन्नयन पार्टीबरोबरची युती तोडली आहे. टीएमसी पक्षातून निलंबीत करण्यात आलेले हुमायून कबीर पश्चिम बंगालमधील मुस्लिमांबद्दल वादग्रस्त दावे करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत कबीर भाजपाबरोबरच्या कथित संबंधांबद्दल बोलताना दिसून येत आहेत. तृणमूल काँग्रेसने कथित स्टिंग ऑपरेशनचे नाव देत हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी आखण्यात आलेल्या मोठा कटाचा हा भाग असल्याचा आरोप टीएमसीने केला आहे.

व्हिडीओत नक्की काय दावा करण्यात आला आहे?

कबीर हे निवडणुकीत भाजपाला फायदा पोहोचावा म्हणून अल्पसंख्याक समुदायाची मते तृणमूल काँग्रेसकडून दुसरीकडे कशी वळवता येतील याची रणनीतीदेखील सांगताना दिसत आहेत. तसेच पुढे ते १ हजार कोटी रूपयांच्या प्लॅनचा उल्लेख करताना ऐकू येत आहेत, त्यापैकी २०० कोटी रुपये अडव्हान्स म्हणून आधीच मिळाले असल्याचा दावाही त्यांनी केल्याचे सांगितले जात आहे. तृणमूल काँग्रेसकडून जारी करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये कबीर यांनी मुस्लिम समुदायाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचे दिसून येत आहे.