पीटीआय, कोलकाता
तृणमूल काँग्रेसने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पश्चिम बंगालच्या जनतेकडून पैसे लुटले असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी केला. भाजप सत्तेत आल्यानंतर हा लुटलेला पैसा परत मिळवेल, असा दावाही शहा यांनी केला. ते उत्तर बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्याच्या राजगंज येथे सभेत बोलत होते.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सत्तेतून गच्छंती होणे ही आता निश्चित असून या प्रक्रियेची सुरुवात राज्याच्या उत्तर भागातूनच होईल, असे शहा म्हणाले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत असूनही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कोणताही डाग किंवा आरोप लागलेला नाही, असे ते म्हणाले.

मोदींनी १२ वर्षे गुजरातवर राज्य केले आणि आणखी १२ वर्षे ते केंद्रात सत्तेच्या सर्वोच्च स्थानी आहेत; तरीही, त्यांच्यावर एका पैशाच्याही भ्रष्टाचाराचा आरोप कोणीही करू शकलेले नाही, असे शहा म्हणाले.

बंगालमध्ये भाजपला सत्तेत निवडून दिल्यास तृणमूलच्या नेत्यांनी जनतेकडून लुटलेला प्रत्येक पैसा आम्ही व्याजासह परत मिळवून गरिबांना परत करू, असे शहा म्हणाले. या वेळी त्यांनी शिक्षक भरती घोटाळा, पूर मदतनिधीची लूट यांचे उदाहरणही दिले.

उत्तर बंगाल तीन ‘टी’ साठी ओळखले जाते. टी (चहा), टिंबर (लाकूड) आणि टूरिझम (पर्यटन). परंतु ममता बॅनर्जींनी यात चौथ्या ‘टी’ची भर घातली आहे. तो म्हणजे तृणमूलच्या गुंडांच्या हातातून अतोनात हाल सोसणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचे अश्रू. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री