भाजपचे शक्तिप्रदर्शन

बोलपूर (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालच्या नागरिकांना परिवर्तनाची आस आहे. राजकीय हिंसाचार, खंडणी, भ्रष्टाचार, बांगलादेशी घुसखोरांपासून त्यांना मुक्तता हवी आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले.

बोलपूर येथे अमित शहा यांच्या ‘रोड शो’द्वारे भाजपने मोठे शक्तिप्रदर्शन केले. भाजप सत्तेत आल्यास राज्याला गतवैभव मिळवून देऊ, अशी ग्वाही देत शहा यांनी या वेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले. ‘‘मी राजकीय कारकीर्दीत अशा अनेक ‘रोड शो’मध्ये भाग घेतला असून काहींचे आयोजनही केले आहे. मात्र इतका प्रतिसाद कधी पाहिलेला नाही. येथील प्रचंड जनसमुदाय पाहता राज्यातील ममता बॅनर्जी सरकारविरोधात जनतेत किती संताप आहे, याचा प्रत्यय येतो,’’ शहा म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणावर जनतेचा विश्वास असल्याचे शहा यांनी नमूद केले. बदल म्हणजे केवळ व्यक्ती बदलणे नव्हे तर भ्रष्टाचार, राजकीय हिंसाचारपासून जनतेला सुटका हवी आहे, असे शहा यांनी स्पष्ट केले.

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शहा यांनी पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली. एखाद्या व्यक्तीला सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या राज्यातील अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा अधिकार केंद्राला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात ममता बॅनर्जी यांना अपयश आल्याची टीका त्यांनी केली. तृणमूल काँग्रेसने बांगलादेशी घुसखोरांना कधीही रोखले नाही, असा आरोपही शहा यांनी केला.