मुंबईतला पाऊस हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. यावेळीही तो चर्चेचाच विषय ठरला आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबईची तुंबई होणं वगैरे नाही. कारण जशी ती दरवर्षी होते तशीच ती यावर्षीही झाली. मुंबईतला पाऊस हा जगात भारी ठरला आहे. देशातल्या आणि जगातल्या प्रमुख शहरांमध्ये जो पाऊस मागच्या पाच दिवसात पडलाय त्यात मुंबईच पहिल्या क्रमांकावर आहे.
जगातल्या प्रमुख शहरांपैकी मुंबईत सर्वात जास्त पाऊस
West Coast Weatherman ने केलेल्या एक्स पोस्ट नुसार जगातल्या प्रमुख शहरांमध्ये जेवढा पाऊस झालाय त्याच्या तिप्पट पाऊस मुंबईत पाच दिवसांत झाला आहे. @RainTracker या एक्स अकाऊंटवरुन ही आकडेवारी देण्यात आली आहे. जगातल्या प्रमुख महानगरांमधला पावसाचा आढावा या पोस्टमध्ये घेण्यात आला आहे. मुंबईला कुणीही स्पर्धक नाही असंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलंय. तसंच मुंबईत जुलैच्या महिन्यात जो पाऊस पडतो ते टार्गेट पाच दिवसांत पूर्ण झाल्याचंही म्हटलं आहे. संपूर्ण वर्षभरात कुठे कसा पाऊस झाला याबाबतची ही स्थिती आहे.

देशातल्या प्रमुख शहरांची वर्षभरातली स्थिती काय?
मुंबईत जुलैच्या पहिल्या पाच दिवसांत ९२० मिमी पाऊस
कोलकातामधे जुलैच्या पाच दिवसांत ३६७ मिमी पाऊस
चेन्नईत नोव्हेंबर महिन्यात ३७७ मिमी पाऊस झाला होता
दिल्लीत ऑगस्ट महिन्यात २३१ मिमी पाऊस झाला होता
बंगळुरुमध्ये सप्टेंबर महिन्यात २०८ मिमी पाऊस झाला होता
हैदराबाद मध्ये ऑगस्ट महिन्यात २०४ मिमी पाऊस झाला होता
मागील वर्षी कोलकाता, हैदराबाद, दिल्ली, बंगळुरु चेन्नईत जितका पाऊस झाला होता त्याच्या जवळपास तीनपट पाऊस हा मुंबईत मागच्या पाच दिवसांमध्ये झाला आहे. मुंबईत मागील पाच दिवसात ९२० मिमी इतक्या जबरदस्त पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी कोलकाता मध्ये जो पाऊस जुलै महिन्यात पडलाय तो ३६७ मिमी असला तरी मुंबईला पडलेल्या पावसाच्या तुलनेत निम्माही नाही.
जगातल्या प्रमुख शहरांची वर्षभराची पावसाची स्थिती काय?
ऑगस्ट महिन्यात जपानमधल्या टोकियो शहरात २३४ मिमी पावसाची नोंद
चीनमधल्या शांघाय शहरात ऑगस्ट महिन्यात २२६ मिमी पावसाची नोंद
पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये जुलै महिन्यात १८९ मिमी पावसाची नोंद
मलेशियातल्या कुआलालंपूर शहरात नोव्हेंबर महिन्यात ३६५ मिमी पावसाची नोंद
जुलै महिन्यात बांगला देशातील ढाका शहरात ३९१ मिमी पावसाची नोंद
सिओल या दक्षिण कोरियातील शहात जुलै महिन्यात ४१४ मिमी पावसाची नोंद
लागोस या नायजेरियातील शहरात जून महिन्यात ४३३ मिमी पावसाची नोंद
व्हिएतनामच्या हो ची मिन शहरात सप्टेंबर महिन्यात ४९० मिमी पावसाची नोंद झाली होती.
फिलीपीन्सच्या मनिला शहरात ऑगस्ट महिन्यात ४७६ मिमी पावसाची नोंद झाली होती
इंडोनेशियातील जकार्ता शहरात फेब्रुवारी महिन्यात ३८१ मिमी पावसाची नोंद झाली होती
जगातल्या प्रमुख शहरांची ही आकडेवारी लक्षात घेतली तर गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात व्हिएतनामच्या हो ची मिन शहरात ४९० मिमी पाऊस पडला होता. मात्र मुंबईत या वर्षी जुलैच्या अवघ्या पाच दिवसात ९२० मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे मुंबईचा पाऊस जगातल्या प्रमुख शहरांमध्ये पहिल्या क्रमाकांवर गेलाय यात शंकाच नाही.
