अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्गच्या चौपदरीकरण करण्यास, बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यापूर्वी कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून दिल्याने चौपदरीकरण रखडले होते. गुजरात व महाराष्ट्रातून जाणाऱ्या या रस्त्याचे काम तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. अमरावती-चिखली १९४ किलोमीटर, चिखली-फगाने १५० किलोमीटर तर फगाने-गुजरात १४० किलोमीटर असे चौपदरीकरणाचे टप्पे असतील. या चौपदरीकरणासाठी सुमारे साडेसात हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग ६च्या चौपदरीकरणासाठी वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. मात्र वर्षभरात ८० टक्के जमीन न सोपविल्याने यासाठी कंत्राटदार कंपनीने (एलअ‍ॅण्डटी) वाढीव मोबदल्याची मागणी केली. केंद्र सरकारने हा मोबदला देण्यास नकार दिला व समन्वयाने करार रद्द केला होता. या महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे दोन्ही राज्यांमधील उद्योग व वाहतुकीला चालना मिळणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
डाळींच्या हमीभावात वाढ
कृषी क्षेत्रास चालना देण्यासाठी केंद्र सरकारने तूर, मूग व उडीद डाळींच्या हमीभावात वाढ करीत प्रतिक्विंटल सुमारे दोनशे रुपये बोनस घोषित केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुरीच्या हमीभावात ७५ रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय २०० रुपयांचा मिळणार असल्याने तुरीचा हमीभाव ४३५० ऐवजी ४६५० रोजी होईल. तांदळाच्या हमीभावात पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे. डाळींना हमीभाव वाढवून दिल्याने शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक संकेत जाईल, असे सरकारने म्हटले आहे.
मूगडाळीचा हमीभाव ४६०० वरून ४८५० रुपये करण्यात आला आहे, तर उडीदडाळीच्या हमीभावात ४३५० वरून ४६२५ वाढ करण्यात आली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या बळकटीकरणासाठी ३ हजार ९०० कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. ६४२ केंद्रांचे बळकटीकरण तर १०४ नव्या केंद्रांची निर्मिती या योजनेतून करण्यात येईल. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ही योजना आखण्यात आली आहे.