scorecardresearch

VIDEO : “…मग तेव्हा अटक का नाही केली?”, अमृतपाल सिंगच्या वडिलांचा पंजाब पोलिसांना सवाल

अमृतपाल सिंग विरोधात सुरु असलेल्या कारवाईमुळे अफवा पसरू नये म्हणून पंजाबमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

amritpal singh
"…मग तेव्हा अटक का नाही केली?", अमृतपाल सिंगच्या वडिलांचा पंजाब पोलिसांना सवाल

खालिस्तानी समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ चा सर्वेसर्वा अमृतपाल सिंग याच्याविरोधात पोलिसांनी मोठी आघाडी उघडली आहे. अमृतपाल सिंगला फरार घोषित करण्यात आलं आहे. दुसरीकडे पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या सहकाऱ्यांना अटक केली आहे. या सर्व घडामोडी घडत असताना अमृतपाल सिंगचे वडील तरसेम सिंग यांनी भाष्य केलं आहे.

‘एएनआय’शी बोलताना तरसेम सिंग म्हणाले, “अमृतपाल सिंग फरार आहे, त्याला अटक केलीय याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती नाही. पोलिसांनी आमच्या घरी येत ३ ते ४ तास छाडाछडती घेतली. तेव्हा पोलिसांनी बेकायदेशीर असं काहीच सापडलं नाही. पण, अमृतपालबाबत पोलिसांनी आम्हाला माहिती द्यावी,” अशी मागणी तरसेम सिंग यांनी केली.

हेही वाचा : लोकशाहीच्या यशाचा काहींना त्रास!, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अप्रत्यक्षपणे राहुल गांधींवर टीका

“दोन एसएसपी लेव्हलचे अधिकारी घरी आले होते. त्यांनी सांगितलं की, अमृतपाल सिंगला अटक करायची आहे. मग, जेव्हा ८-८.३० वाजता अमृतपाल सिंग घरातून गेला तेव्हा का अटक केली नाही?,” असा सवाल तरसेम सिंग यांनी पंजाब पोलिसांना विचारला आहे.

‘‘पोलीस ‘भाईसाब’च्या मागावर आहेत’’

पोलीस आपला पाठलाग करत असल्याचा दावा करणारे काही व्हिडीओ अमृतपाल याच्या काही समर्थकांनी समाजमाध्यमांवर शेअर केल्या. त्यात अमृतपाल एका वाहनात बसला असून, त्याचे काही समर्थक ‘‘पोलीस ‘भाईसाब’च्या मागावर आहेत,’’ असे म्हणत असल्याचेही एका व्हिडीओत दिसत होते.

दरम्यान, पंजाब पोलिसांनी नागरिकांनी शांतता आणि ऐक्य कायम राखण्याचे आवाहन केले आहे. पंजाब पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करत आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच खोट्या बातम्या किंवा द्वेषपूर्ण भाषणे पसरवू नयेत, असे आवाहन करणारा ट्वीटसंदेश पोलिसांनी प्रसारित केला आहे.

‘आयएसआय’शी संबंध?

पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडल्यापासून फरार झालेल्या अमृतपालचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि परदेशातील काही दहशतवादी गटांशी संबंध आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली. अमृतपालने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक गुप्त धमकीही दिली होती. तो शीख तरुणांना त्यांच्या ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेकडे आकर्षित करून पंजाबमधील परिस्थिती अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : पूर्व लडाखमध्ये ताबारेषेवरील परिस्थिती अद्याप नाजूक, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची कबुली

नेमकं प्रकरण काय?

पंजाबच्या रूपनगर जिल्ह्यातील वरिंदर सिंह यांनी लवप्रीत सिंह, अमृतपाल सिंह यांच्यासह ३० जणांवर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर लवप्रीतसह एकाला पोलिसांनी अटक केली होती. पण, पोलिसांनी एकास सोडून देत लवीप्रतला जेलमध्येच ठेवलं होतं. लवप्रीतला सोडण्यासाठी अमृतपालने पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांसह जात धमकी दिली. यावेळी अमृतपालचे समर्थक आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. यात अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 08:18 IST