Free iPhone Langar Chandigarh: ॲपलने आयफोन १८ प्रो आणि प्रो मॅक्स फोन लाँच केल्यापासून जगभरात या नव्या मॉडेलची चर्चा आहे. भारतात या मॉडेलच्या किमती लाखांच्याही वर असल्यामुळे सोशल मीडियावर यासंबंधी विविध मीम्स तयार होत आहेत. यातच अमृतसरच्या एका व्यावसायिकाने १०० आयफोन १७ चे मॉडेल मोफत वाटण्याची घोषणा केल्यानंतर आश्चर्य व्यक्त करण्यात आले. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर राकेश त्रेहान ज्याला ‘राजा दी किंग’ या नावानेही ओळखले जाते, त्याने ‘आयफोन लंगर’ आयोजित करणार असल्याची घोषणा केली. याआधी रोख रक्कम आणि पेट्रोल मोफत वाटल्यामुळे राकेश त्रेहान चर्चेत आला होता. मात्र आता नव्या घोषणेमुळे चंदीगड पोलीस सतर्क झाले आहेत.
राकेश त्रेहान यांनी केलेल्या घोषणेनुसार, २२ सप्टेंबर रोजी आयफोन लंगर लागणार होता. राकेश यांनी केलेल्या दाव्यानुसार, देवीने त्यांच्या स्वप्नात त्यांना ही तारीख निवडण्यास सांगितले होते. मंगळवारी दुपारी १२ ते २ दरम्यान मोफत आयफोन वाटण्याचा कार्यक्रम घेतला जाणार होता. मात्र मोफत आयफोन घेण्यासाठी मोठी गर्दी उसळून चेंगराचेंगरी होईल, अशी शक्यता वर्तवत पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नाही.
चंदीगडचे उपायुक्त निशांत यादव यांनी सांगितले की, २२ सप्टेंबर रोजी प्रस्तावित आयफोन लंगरला पोलिसांनी परवानगी देऊ नये. ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना यादव म्हणाले, “मी नुकतेच केंद्रशासित प्रदेशाच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना चंदीगडमध्ये असा कार्यक्रम आयोजित करण्यापासून थांबवण्यास सांगितले आहे. अनिश्चित गर्दीला परवानगी देता येणार नाही. मागच्या वेळीही त्यांनी मोफत पेट्रोल लंगरची घोषणा केली होती. अशा कार्यक्रमाला हजारो लोक एकत्र जमू शकतात आणि चेंगराचेंगरी होऊ शकते. चंदीगडमध्ये अशा आयफोन लंगरवर बंदी घालण्यात येईल.”
चंदीगडच्या पोलीस अधीक्षक कंवरदीप कौर म्हणाल्या की, आयोजकाने अशा कोणत्याही कार्यक्रमासाठी परवानगी मागितली नव्हती. असा कोणताही कार्यक्रम आयोजित करणे हे बीएनएसएसच्या कलम १६३ चे उल्लंघन ठरेल.
राजा दी किंग कोण आहे?
राकेश त्रेहान हा अमृतसरमधील व्यावसायिक असून सोशल मीडियावर तो राजा दी किंग नावाने प्रसिद्ध आहे. मोफत देण्याच्या त्याच्या घोषणेला बरीच लोकप्रियता मिळते. याआधी त्याने ‘पेट्रोल लंगर’ आयोजित केला होता. ज्यात काही निवडक पेट्रोल पंपावर दुचाकी आणि रिक्षासाठी ५०० रुपयांचे कुपण देण्यात आले. तर चारचाकी गाड्यांसाठी १,००० रुपयांचे कुपण देण्यात आले होते.
मोफत पेट्रोल मिळत असल्यामुळे शेकडो लोकांनी एकाचवेळी पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले होते. ज्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करून गर्दी पांगवावी लागली. यानंतर पेट्रोल पंप काही वेळेसाठी बंद ठेवण्यात आले.
त्रेहान स्वतःला क्रिप्टो ट्रेडर आणि शेअर मार्केट गुंतवणूकदार म्हणवतो. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, त्याची ९० टक्के संपत्ती तो लोकांमध्ये वाटण्याचा विचार करत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी चंदीगडमध्ये गरजू लोकांना अन्नासाठी प्रत्येकी ५०० रुपयांचे वाटप केले होते.
मोफत पेट्रोल किंवा रोख रक्कम वाटण्यासाठी राकेश त्रेहानकडून लंगर या शब्दाचा वापर केला जातो. गुरुद्वारात दिल्या जाणाऱ्या प्रसादाला लंगर म्हणतात. त्यामुळे या राकेश त्रेहानच्या घोषणेला आणखी प्रसिद्धी मिळते.
आयफोन लंगर कसा होणार?
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना राकेश त्रेहान यांनी सांगितले की, २२ सप्टेंबर रोजी सर्व माध्यमांसमोर आयफोनचे वाटप केले जाणार आहे. मला देवी मातेने स्वतः ही तारीख दिली. आयफोनबाबत लोकांचे आकर्षण पाहून मी आयफोन वाटण्याचा निर्णय घेतला आहे. चंदीगड आणि मोहालीमधील लोक आपली नावे यासाठी देऊ शकतात. ज्यांची नावे ड्रॉ मध्ये येतील, त्यांना जाहीर आयफोन दिला जाईल.
