An Ambulance reportedly catches fire in Kumbh 2025 : उत्तर प्रदेशातील महाकुंभ येथील संगम घाटावर आज पहाटे चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. येथील बॅरिकेट्स हटल्याने लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला, परिणामी काही भाविक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमी आणि जीवितहानीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून सध्या जखमींवर उपचार सुरू करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. दरम्यान, या रुग्णांच्या सेवेकरता कार्यरत असलेल्या एका रुग्णावाहिकेलाच आज आग लागल्याचीही घटना समोर आली आहे. यासंदर्भातील व्हिडिओही पीटीआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.

महाकुंभ मेळ्यात आपत्कालनी परिस्थितीकरता अनेक सोयी सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, अशाही स्थितीत आज चेंगराचेंगरी होऊन अनेक भाविक जखमी झाले. अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज असलेल्या रुग्णवाहिकेला आज अचानक आग लागली. रुग्णवाहिकेच्या चालकाच्या केबिनमध्ये ही आग लागली. आग विझवण्याचा प्रयत्न होत असल्याचं व्हिडिओतून दिसत आहे. दरम्यान, या रुग्णवाहिकेत कोणी रुग्ण होती की नव्हते याबाबत अधिक माहिती अद्याप मिळालेही नाही.

चेंगराचेंगरीबाबत योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

योगी आदित्यनाथ म्हणाले, संगम घाटावर मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र आल्याने चेंगराचेंगरी झाली. पण घटनास्थळी प्रशासन सज्ज आहे. रात्री १ ते दोन वाजताच्या दरम्यान आखाडा मार्गावर अमृत स्नानासाठी भाविक जमले होते. तेथे बॅरिकेट्स लावण्यात आले होते. त्यावेळी बॅरिकेट्स निघाल्याने भाविक गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातत्याने प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवारी सायंकाळी ६ वाजल्यापासूनच घाटावर गर्दी वाढत गेली.

“संगम घाटातील घटनेनंतर घटनेची माहिती घेण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत चारवेळा फोन केला असून देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जे. पी नड्डा यांनीही संपर्क साधला आहे. तसंच, राज्याचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनीही घटनेची माहिती घेतली आहे”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. तसंच, परिस्थितीवर लक्ष ठेवण्याकरता उच्चस्तरीय बैठकही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये राज्याचे मुख्य सचिव, डीजीपी, मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकाही सामील आहेत, अशीही माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.