२२ वर्षांच्या एका मुलीचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला. बंगळुरु या ठिकाणी ही घटना घडली. १३ जून रोजी ही घटना समोर आली आणि पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये एका ऑटो रिक्षा चालकाला गजाआड केलं. पोलिसांनी याबाबत अशी माहिती दिली की या रिक्षा चालकाने तरुणीची हत्या केली, त्यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? आपण जाणून घेऊ.
भवानी एस असं या २२ वर्षीय तरुणीचं नाव
भवानी एस. असं नाव असलेली तरुणी बंगळुरुतल्या मागदी मार्गावर असलेल्या तुलसी नगर भागात एका फ्लॅटमध्ये भाडे तत्त्वावर राहात होती. चंद्रशेखर चंदू याचं लग्न झालेलं होतं, मात्र भवानी सह त्याचं प्रेम प्रकरण सुरु होतं. चंदू अर्थात चंद्रशेखर हा बंगळुरुमध्ये रिक्षा चालवण्याचं काम करतो. चंद्रशेखरचे भवानीशी विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. भवानी ही तरुणी पदवीचं शिक्षण घेतलेली होती. १३ जूनच्या दिवशी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भवानीचे आई वडील म्हणजेच श्रीनिवास आणि ममता या दोघांना भावनाच्या मावशीने फोन केला आणि सांगितलं की भावनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिलीये की तिने लग्न केलंय. याबाबत श्रीनिवास आणि ममता यांना याबाबत काहीच माहिती नव्हती. श्रीनिवास यांनी भवानीला फोन केला. पण ती फोन उचलत नव्हती. त्यानंतर श्रीनिवास यांनी भवानी ज्या घरात वास्तव्य करत होती त्या घर मालकाच्या पत्नीला फोन केला. तिने श्रीनिवास यांना सांगितलं की भवानी घरात आहे आणि दरवाजा आतून बंद आहे. श्रीनिवास आणि ममता म्हणजेच भवानीचे आई वडील सकाळी ९.३० च्या सुमारास बंगळुरुत भवानीच्या घरी पोहचले. तोपर्यंत ती दार उघडत नव्हती त्यामुळे स्थानिक पोलीसही त्या ठिकाणी आले होते. पोलिसांनी दार तोडलं तेव्हा भवानीचा मृतदेह त्यांना घरात पडलेला आढळला. त्यानंतर पोलिसांनी भवानीचा प्रियकर चंदूलाही तिथेच पाहिलं त्याची शुद्ध हरपली होती.
चंदूची शुद्ध हरपली होती
पोलिसांनी चंदूला खासगी रुग्णालयात नेलं. तो शुद्धीवर आल्यानंतर त्याची चौकशी सुरु केली. त्यावेळी त्याने सांगितलं की भवानी आणि मी दोघांनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात भवानीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात चंदूची चौकशी केली. त्यावेळी त्यांना कळलं की चंदू आणि भवानी यांचं अफेअर होतं आणि दोघांनी कुणालाही कसलीच कल्पना न देता लग्नही केलं होतं. पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार भवानीच्या आई वडिलांनी तिचं एका मुलाशी लग्न ठरवलं होतं. त्यांना भवानीचं प्रेम प्रकरण, तिने कुणालाही न सांगता केलेलं लग्न याबाबत काहीही कल्पना नव्हती. चंदूने या लग्नाला विरोध दर्शवला होता. भवानीच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनुसार चंदूला तिने हे सांगितलं की मी तिचं लग्न ठरवलं आहे. ज्यानंतर चंदू वैतागला, चिडला आणि आक्रमक होत त्याने भवानीची हत्या केली. तसंच नंतर चंदूने स्वतःही विष प्यायलं आणि दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं भासवलं. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
चंदूच्या विरोधात पोलिसांनी नोंदवला हत्येचा गुन्हा
चंदूच्या विरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (हत्या) आणि कलम २३८ (पुरावा नष्ट करणे) या दोन कलमांच्या अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भवानीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. गळा दाबून तिची हत्या करण्यात आल्याचं या अहवालात म्हटलं आहे. तसंच आता या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे असंही पोलिसांनी सांगितलं.
इन्स्टाग्रामच्या फोटोमुळे काय कळलं?
१३ जूनच्या दिवशी इन्स्टाग्रामवर भवानीच्या मावशीने तिचा फोटो पाहिला. त्यात ती आणि चंदू दोघंही बरोबर दिसले. लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भवानीने ही पोस्ट लिहिली होतं. भवानीच्या मावशीने ही पोस्ट पाहून तातडीने तिच्या आई वडिलांना फोन केला आणि भवानीचं लग्न कधी केलं? याबाबत विचारणा केली ज्यानंतर ही सगळी घटना उघड झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदू या रिक्षावाल्याने आणि भवानी या तरुणीने वर्षभरापूर्वी एका मंदिरात जाऊन लग्न केलं होतं. चंदू हा अनेकदा भवानीच्या घरी यायचा. एक ते दोन दिवस तो थांबायचा आणि मग निघून जायचा. भवानीने तिच्या घरी या सगळ्याबाबत काहीही सांगितलेलं नव्हतं. जेव्हा भवानीने चंदूला सांगितलं की माझ्या घरातल्या लोकांनी माझा साखरपुडा ठरवला आहे तेव्हा तो चिडला. त्याने तिला मारहाणही केली आणि म्हणाला की आपलं लग्न झालंय, तू दुसरं लग्न कसं काय करु शकतेस? त्यावेळी चंदूशी लग्न झाल्याची बाब तिने घरातल्या लोकांना सांगितली नाही.
भवानीच्या वडिलांनी काय सांगितलं?
भवानी बंगळुरुला राहात होती, आम्हाला तिच्या प्रेम प्रकरणाबाबत आणि तिच्या लग्नाबाबत काहीही कल्पना नव्हती. आम्ही तिचं लग्न ठरवलं होतं आणि साखरपुड्याची तारीखही काढली होती आणि ही सगळी घटना समोर आली. चंदू या तरुणाने माझ्या मुलीची हत्या केली आणि मग आत्महत्येचं नाटक केलं. भवानीच्या वडिलांचा हा संशय खरा ठरला कारण भवानीच्या शवविच्छेदन अहवालात तिची हत्या गळा दाबून करण्यात आल्याचं समोर आलं.
