Anand Dubey Resigns Shiv Sena UBT : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी आपल्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पक्षात होत असलेल्या वैचारिक मतभेदांमुळे आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकार परिषदेत आणि समाजमाध्यमांवर आपली भूमिका मांडताना आनंद दुबे यांनी पक्षाच्या बदलत्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
माझा जीव गुदमरतोय; आनंद दुबे यांचे खळबळजनक आरोप
राजीनामा देताना आनंद दुबे म्हणाले, “मी शिवसेना (UBT) पक्षातील माझ्या प्राथमिक सदस्यत्वावरून आणि राष्ट्रीय प्रवक्तेपदावरून स्वतःला पूर्णपणे मुक्त करत आहे. गेल्या ४-५ वर्षांपासून मी महाराष्ट्राच्या स्थानिक मुद्द्यांपासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पक्षाची बाजू सातत्याने मांडत आलो. पण एका रात्रीत काही बदलत नाही. गेली कित्येक महिने मी अत्यंत अस्वस्थ होतो आणि पक्षात माझा जीव गुदमरत होता.”
हिंदुत्व आणि सावरकरांच्या मुद्द्यावरून नाराजी
आपल्या वैचारिक भूमिकेवर बोलताना ते म्हणाले, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मी आदर्श मानतो. काँग्रेसमध्येही मी काम केलं. २०१९ पासून शिवसेनेत काम करण्याची संधी मिळाली. कारण, बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात काम करण्याचं माझं स्वप्न होतं. ३१ मार्च २०२१ ते १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रवक्तेपदाची प्रामाणिक जबाबदारी सांभाळली. पण ज्या हिंदुत्व आणि सनातन धर्माच्या आदर्शांवर माझा गाढ विश्वास आहे, त्याच आदर्शांना पक्षात राहून मला आवाज उठवता येत नाहीये. प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते. मी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर विश्वास ठेवणारा आणि स्वामी विवेकानंदांच्या आदर्शांवर चालणारा कार्यकर्ता आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे माझे आदर्श आहेत. परंतु, सध्या मला जी राजकीय भूमिका मांडायला सांगितली जात आहे, ती माझ्या तत्त्वांना पटणारी नाही.”
ते पुढे म्हणाले, “मी ज्या ट्रेनमध्ये बसलो आहे, तिथं इतकं झुरळी आली आहेत की माझा जीव गुदमरत आहे. मला जवळच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर उतरावलं लागले. म्हणून मी उlरत आहेत. जेव्हा एखादी स्वच्छ ट्रेन येईल, तेव्हा मी तिकिट मिळाली की चढणार आहे.”
‘ध्रुव राठी, उमर खालिद माझे हिरो नाहीत’
दुबे यांनी महाविकास आघाडीच्या आणि पक्षाच्या सध्याच्या भूमिकेवर अप्रत्यक्ष टोला लगावला. ते म्हणाले, “माझे हिरो शरजील इमाम, उमर खालिद किंवा ध्रुव राठी असू शकत नाहीत. माझा हिरो स्मित मच्छार आहे, ज्याने संपूर्ण जगाला बजरंगबलीची ताकद दाखवून दिली. पण अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, आमच्या पक्षाकडून त्यांच्या समर्थनार्थ एक साधे ट्विट देखील करण्यात आले नाही.”
