दिल्लीच्या सायबर पोलीस पथकाने पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथील रहिवासी असलेल्या आनंद कुमार (३५) या कुख्यात सायबर गुन्हेगाराला अटक केली आहे. हा आरोपी देशभरातील महिलांना लक्ष्य करत मोठे हनिमून ट्रॅपिंग , रोमान्स स्कॅम आणि ऑनलाइन ब्लॅकमेलिंगचे रॅकेट चालवत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने डेटिंह आणि मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्म्सवर तसेच सोशल मीडिया अॅप्सवर बनावट प्रोफाईल तयार केल्या होत्या. ज्यामध्ये तो स्वत:ची ओळख डॉक्टर, उद्योजक, वकिल, चित्रपट निर्माता किंवा इतर व्यावसाय करत असल्याचे भासवत असे. या प्रोफाईलचा वापर करून हा आरोप पीडित महिलांबरोबर विश्वासाचे नाते तयार करायचा. भावनिक नाते तयार झाले की नंतर तो त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांनी पैसे उकळत असे. यासाठी तो लग्नाचे आश्वासन, मेडिकल इमर्जन्सी, व्यवसायातील नुकसान किंवा नोकरीची संधी अशी वेगवेगळी कारणे वापरत असे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आनंद कुमार याने ५०० हून अधिक महिलांना लक्ष्य केले असून त्यांच्याकडून अंदाजे दोन कोटी रूपयांहून अधिक पैसे लुबाडले आहेत. अनेक प्रकरणांमध्ये, त्याने ऑनलाईन संभाषणादरम्यान शेअर केलेले महिलांचे खाजगी फोटो आणि व्हिडीओ देखील गोळा केले होते आणि या फोटोंचा वापर करून तो महिलांना ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी द्यायचा.
प्रकरण उजेडात कसे आले?
एका पीडित महिलेने वैभव अरोरा नावाच्या एका फेक इन्स्टाग्राम प्रोफाईलने आपली जवळपास ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची ई-एफआयआर दाखल केली, त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उजेडात आले. आरोपीने सुरूवातीला या महिलेला डेटिंग अॅपवर संपर्क केला, तिचा विश्वास संपादन केला आणि नंतर त्यांच्यातील संवाद हा इन्स्टाग्राम आणि वेगवेगळ्या क्रमांकावरून वापरले जात असलेल्या व्हॉट्सअॅपवर सुरू झाला. आरोपीने या महिलेला लग्नाचे आश्वासन दिले होते आणि इतकेच नाही तर त्याने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घडवून आणण्यासाठी ‘आनंद’ नावाच्या एका बनावट मित्राची ओळख करून दिली होती.
त्यानंतर आरोपीने मेडिकल इमर्जन्सी आणि व्यावसायात नुकसान झाल्याचा बनाव करत महिलेकडे आर्थिक मदत मागितली. जेव्हा महिलेने पैसे परत मागितले तेव्हा त्याने प्रतिसाद देणे बंद केले आणि नंतर तिला व्हॉट्सअॅपवर वैभवचा मृत्यू झाल्याचे खोचे सांगून तिच्याशी संपर्क तोडून टाकला.
आरोपीचा शोध कसा लागला?
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी डिजीटल फूटप्रिंटचे सखोल तांत्रिक विश्लेषण केले, ज्यामध्ये आयपी लॉग्ज, सोशल मीडिया अकाउंट्स, मोबाईल क्रमांक आणि आर्थिक व्यवहार यांचा समावेश होता. या पडताळणीत आरोपीशी संबंधित दोन फोन नंबर पश्चिम बंगालच्या २४ परगणा भागात सक्रिय असल्याचे आढळून आले. पोलिसांनी अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आणि अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या.
आरोपीच्या उपकरणांची तपासणी केली असता तो एकाच वेळी वेगवेगळ्या नावाने खाती चालवत असल्याचे आढळून आले, ज्यामध्ये त्याने वैभव अरोरा, डॉ. रोहित बेहल, तरूण, आनंद शर्मा आणि शिखा अशा नावांचा समावेश होता. पोलिसांपासून बचावासाठी तो अनेक मोबाईल फोन आणि वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर घेतलेले सिम कार्ड वापरत असे, तसेच तो वारंवार आपली उपकरणे बदलत असे.
पोलिसांनी आरोपीकडून चार स्मार्टफोन्स, आठ सीम कार्ड्स, तीन डेबिट कार्ड्स, चार सोन्याचे ब्रेसलेट आणि पाच सोन्याच्या साखळ्या जप्त केल्या आहेत. इतकेच नाही तर आरोपीने लुबाडलेला बहुतांश पैसा ऑनलाईन गेमिंग आणि स्वतःच्या खर्चासाठी उडवल्याचीही बाब समोर आली आहे.
