आनंद महिंद्रा करोनाला वैतागले; म्हणाले, “करोना एखादी व्यक्ती असता तर त्याला बॉक्सिंग रिंगमध्ये घेऊन…!”

आनंद महिंद्रांनी करोनाच्या दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या व्हेरिएंटबाबत केलेलं एक ट्वीट व्हायरल होत आहे.

anand mahindra tweet on corona
आनंद महिंद्रांनी करोनाबाबत केलेलं एक ट्वीट व्हायरल होत आहे.

उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा त्यांच्या हटके ट्वीट्समुळे कायम चर्चेत असतात. राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच विषययांवर आनंद महिंद्रा करत असलेले ट्वीट व्हायरल होत असतात. आता आनंद महिंद्रांनी करोनासंदर्भात केलेलं एक ट्वीट व्हायरल होत असून त्यावर नेटिझन्स देखील प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून जगभरातल्या नागरिकांना मोठा धोका म्हणून उभा राहिलेला करोना अद्याप जायचं नाव घेत नसून त्याचे नवनवे व्हेरिएंट समोर येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर सातत्याने आव्हानं उभी राहात आहेत. असाच एक नवीन व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत सापडला असून त्यावरच आनंद महिंद्रांनी ट्वीट केलं आहे.

करोनाचा एका नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेत मल्टिपल म्युटेशन क्षमता असलेला हा नवा व्हेरिएंट आढळला आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर या नव्या व्हेरिएंटची माहिती समोर आली आहे. हा व्हेरिएंट B.1.1.1529 या नावाने ओळखला जातो. या विषाणूचे बोटस्वानामध्ये ३, दक्षिण आफ्रिकेत ६ तर हाँगकाँगमध्ये १ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारही सावध झालं असून आरोग्य मंत्रालयाने बोटस्वाना, दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँगमधून येणाऱ्या प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

भारतीयांनो सावधान! ‘तो’ पुन्हा आलाय; दक्षिण आफ्रिकेत सापडला करोनाचा डेल्टापेक्षाही भयानक व्हेरिएंट

याच व्हेरिएंटबाबत वैतागून आनंद महिंद्रांनी ट्वीट केलं आहे. “आता या कोविडचा मला कंटाळा आलाय रे… मला तर वाटतं जर करोना एखादी त्रास देणारी व्यक्ती असता, तर त्याला मी थेट बॉक्सिंग रिंगमध्ये घेतला असता आणि झोडपून काढला असता”, असं महिंद्रा या ट्वीटमध्ये म्हणतायत. या ट्वीटसोबत त्यांनी दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या व्हेरिएंटबाबतचं वृत्त शेअर केलं आहे.

आनंद महिंद्रा यांच्या या ट्वीटवर नेटिझन्सनी देखील भन्नाट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

काही नेटिझन्सनी आनंद महिंद्रांच्या ट्वीटवर टॉम अँड जेरीचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

काहींनी तर रिंगमध्ये जाण्याचीही वाट पाहणार नसल्याचं ट्वीट केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anand mahindra tweet on corona viral social media new variant in south africa pmw