उद्योजक आनंद महिंद्रा कायम कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. आनंद महिंद्रा हे अनेकदा सोशल मीडियावर प्रेरणा देणाऱ्या पोस्ट देखील शेअर करत असतात, तर कधी एखाद्या घटनेबाबत भाष्य करणाऱ्या पोस्ट शेअर करत असतात. आता अशाच प्रकारची एक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. रस्त्याच्या बाजूला जादू करणाऱ्या एका चिमुकल्या मुलाचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे आणि त्या चिमुकल्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची घोषणा केली आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या चिमुकल्या जादूगार मुलाला मदत करण्यासाठी पुढाकार घेत मदतीचं आश्वासन दिलं आहे. आनंद महिंद्रा यांच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केलं असून त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी काय म्हटलं?
“हा मुलगा खूप हुशार आहे. तो अजूनही नैनितालच्या रस्त्यावर काम करतोय का? मला त्याला केवळ त्याच्या अभ्यासातच नाही, तर त्याच्या जादूतील आवडीला देखील प्रोत्साहन द्यायचं आहे. तो जगातील महान जादूगारांपैकी एक का बनू नये? मला कोणीतरी त्याच्याशी आणि त्याच्या पालकांशी संपर्क साधायला मदत करू शकेल का?”, असं आनंद महिंद्रा यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
व्हिडीओमध्ये काय आहे?
आनंद महिंद्रा यांनी ‘एक्सवर (ट्विटर) एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक साहिल नावाचा चिमुकला मुलगा रस्त्याच्या कडेला जादू करताना दिसत आहे. हा मुलगा उत्तराखंडमधील एका शहरातील एका रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचं आपल्या जादूच्या प्रयोगाच्या माध्यमातून मनोरंजन करताना दिसत आहे.
राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातलेल्या चिमुकल्याचे जादूचे प्रयोग पाहून अनेकजण भारावून गेल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. एवढंच नाही तर तो समोर जमलेल्या मोठ्या गर्दीसमोर आत्मविश्वासाने जादूचे प्रयोग सादर करत असल्याचं दिसत आहे. एक वाटी, एक जादूची कांडी, एक नाणं आणि लहान लाल चेंडू अशा साध्या वस्तूंचा वापर करून या चिमुकल्याने अशा अनेक युक्त्या सादर केल्या की हे पाहून प्रेक्षकही थक्क झाल्याचं दिसत आहे. या छोट्याशा मुलाच्या जादूच्या प्रयोगाची आनंद महिंद्रा यांनाही भुरळ पडल्याचं दिसत आहे.
सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्या?
दरम्यान, अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आनंद महिंद्रा यांच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. तसेच अनेकांनी त्या मुलाला शोधण्यात मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. एका युजर्सने म्हटलं की, “सर मी शोधण्याचा प्रयत्न करेन. माझे नातेवाईक हल्द्वानीमध्ये राहतात, मी त्यांच्याशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो.”
तसेच दुसऱ्या एका युजर्सने म्हटलं की, “या साहिलचं कुटुंब मूळचं राजस्थान राज्यातील आहे. सध्या ते उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील रामनगर परिसरात राहतात.” तसेच आणखी एका युजर्सने म्हटलं की, “मला वाटतं की अशा मुलांमधील कौशल्य कोणी ओळखू शकत नाही. आता हा मुलगा आनंद महिंद्रा यांच्यामुळे प्रसिद्ध होणार, ही तर आणखी चांगली गोष्ट आहे.”
