Anar Patel on Patel community youth behavior: उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या कन्या अनार पटेल यांनी नुकतंच केलेलं एक विधान सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. अनार पटेल या सोमवारी एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी पटेल समाजाची सद्यस्थिती, नातेसंबंध आणि स्त्री-पुरूष समानतेबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी पटेल समुदायातील अनेक तरुण हे विवाहासाठी योग्य नसल्याचं विधान केल्यानंतर त्यावर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. याच कारणामुळे पटेल समाजातील मुली इतर समाजातील मुलांची जोडीदार म्हणून निवड करत असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

काय म्हणाल्या अनार पटेल?

लेवा पाटीदार समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या श्री खोदरधाम ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अनार पटेल सध्या सांभाळत आहेत. याच अनुषंगाने एका कार्यक्रमानिमित्त त्यांना बनसकंठा भागातील गढ गावात प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना अनार पटेल यांनी पटेल समाजाबाबत सविस्तर भूमिका मांडली.

“पटेल समाजातील तरुण विवाहासाठी जोडीदार म्हणून अयोग्य आहेत. त्यामुळेच समाजातील तरुणी इतर समाजातल्या तरुणांची जोडीदार म्हणून निवड करत आहेत. जर आपली मुलं दारू पित असतील, रिकामे भटकत असतील आणि काम करत नसतील, तर आपल्या मुली इतर समाजातल्या मुलांशीच लग्न करणारच. आपण यावर विश्वास का ठेवत नाही? आपण कायम आपल्या मुलींनाच चांगलं वागण्याचे सल्ले का देत असतो?” असा सवाल अनार पटेल यांनी केला आहे.

महिलांनाही दिला सल्ला

दरम्यान, यावेळी अनार पटेल यांनी पटेल समाजातील उपस्थित महिलांनादेखील या स्थितीवर पावलं उचलण्याचं आवाहन केलं आहे. जर महिलांनीच या गोष्टी खपवून घेतल्या, तर समाजदेखील त्या तशाच चालू देईल. त्यामुळे महिलांनी आपलं संघटन मजबूत करून या गोष्टींबाबत योग्य ती पावलं टाकणं आवश्यक आहे, असं अनार पटेल यांनी नमूद केलं. “आपल्यामधील जी ऊर्जा आणि हिंमत आहे, ती फक्त सेवेसाठी वापरा. अशा लोकांची सेवा करा ज्यांना आपली गरज आहे – मग ते गरीब असोत किंवा समाजातील गरजू लोक. त्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच आपली खरी ओळख असायला हवी”, असंही त्या म्हणाल्या.

“पटेल समाजातील तरुणांनी बोलण्यात शिष्टाचार पाळावा”

दरम्यान, पटेल समाजातील तरुणांना कसं बोलायचं हे देखील शिकवण्याची आवश्यकता असल्याचंही अनार पटेल यांनी नमूद केलं. “आपल्या मुलांनी समोरच्याशी विनम्रपणे कसं बोलायला पाहिजे, हेदेखील शिकायला हवं”, असं त्या म्हणाल्या.