एएनआय, नवी दिल्ली
भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांची ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’साठी निवड करण्यात आली. २२ सप्टेंबर रोजी गुजरातमधील केवडिया येथे होणाऱ्या ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात नाग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अनंत नाग यांना त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीसाठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील, विशेषतः कन्नड चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे, असे ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ने बुधवारी या पुरस्काराची घोषणा करताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सन्मानाबद्दल नाग यांचे अभिनंदन केले. ‘‘दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. अनेक दशकांपासून त्यांच्या सहज अभिनयाने, अष्टपैलूत्वाने आणि उत्कृष्ट कामगिरीने भारतीय चित्रपटसृष्टीवर, विशेषतः कन्नड चित्रपटसृष्टीवर खोलवर प्रभाव पाडला आहे. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत एक दुर्मिळ खोली आणि अस्सलपणा दिसून आला आहे. एका खऱ्या अर्थाने श्रेष्ठ कलाकारासाठी हा अत्यंत योग्य सन्मान आहे,’’ असे मोदी यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.
सहा दशकांची कारकीर्द
४ सप्टेंबर १९४८ रोजी अनंत नागरकट्टे म्हणून जन्मलेले अनंत नाग हे कन्नड चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव. त्यांची अभिनयाची कारकीर्द १९६७पासून सुरू झाली असून त्यांनी ३००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यामध्ये २५०हून अधिक कन्नड चित्रपटांचा समावेश आहे. कन्नडशिवाय हिंदी, तेलुगू, तमिळ, मराठी, मल्याळम आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. चित्रपटांव्यतिरिक्त, नाग यांनी दूरचित्रवाणीवरही काम केले आहे. लेखक आर. के. नारायण यांच्या साहित्यावर आधारित दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका ‘मालगुडी डेज’मध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली. आपल्या कारकिर्दीत या अभिनेत्याला पाच वेळा ‘कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. २०२५ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ या नागरी पुरस्कारानेही गौरविण्यात आले.
