Anant Singh Jailed For Murder Case Leading Mokama Assembly Constituency: बिहार विधानसभा निवडणुकीची आज सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. यामध्ये संयुक्त जनता दलाचे मोकामा विधानसभा मतदार संघातील उमेदवार अनंत सिंह हे मोठ्या फरकाने आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. अनंत सिंह सध्या एका खून प्रकरणात तुरुंगात आहेत.
मतमोजणीमध्ये अनंत सिंह आघाडीवर आल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात त्यांचे अनेक फलक झळकू लागले आहेत. अनंत सिंह यांच्या संभाव्य सुटकेचा संदर्भ देत, एका फलकावर, “जेल का फाटक टूटेगा, हमारा शेर छुटेगा”, असे लिहिल्याचे पाहायला मिळाले.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडून बिहार विधानसभा लढवलेल्या अनंत सिंह यांना जनसुराज पक्षाचे समर्थक दुलार चंद यादव यांच्या हत्येप्रकरणी २ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे.
या विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या तिकिटावर लढणाऱ्या प्रियदर्शी पियुष यांच्यासाठी मोकामा येथे प्रचार करताना दुलार चंद यादव यांची हत्या झाली होती. दुलार चंद यादव यापूर्वी राष्ट्रीय जनता दलात होते.
दुलार चंद यादव यांच्या शवविच्छेदन अहवालात हृदय आणि फुफ्फुसांना झालेल्या दुखापतीमुळे हृदय श्वसनक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले, असे पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी सांगितले होते.
पोलीसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि अनंत सिंह, मणिकांत ठाकूर आणि रणजीत राम या तिघांना अटक केली.
अनंत सिंह यांचा पाच वेळा विजय
२८ गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या अनंत सिंह यांनी मोकामा विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा विजय मिळवला आहे. २००५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २०१० च्या निवडणुकीत ते संयुक्त जनता दलाकडून पुन्हा विजयी झाले.
पुढे २०१५ मध्ये, नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी युती केल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि संयुक्त जनता दलाच्या उमेदवाराचा पराभव केला.
पुढे २०२० मध्ये अनंत सिंह विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय जनता दलात गेले आणि पुन्हा एकदा विजयी झाले. २०२२ मध्ये त्यांना शस्त्रास्त्र प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. त्यामुळे त्यांचे विधानसभा सदस्यत्व गेले होते. त्यांच्या पत्नी नीलम देवी यांनी पोटनिवडणूक लढवली आणि मोकामा मतदारसंघातून विजयी झाल्या. आता यंदाच्या निवडणुकीत अनंत सिंह पुन्हा एकदा संयुक्त जनता दलात परतले आहेत.
