India’s Most Expensive Number Plate: भारतात महागड्या गाड्यांसह आकर्षक नंबर प्लेट्सचीही चांगलीच चलती असते. अनेकांना फॅन्सी नंबर प्लेट्स घेण्याची हौस असते. बॉस, दादा अशा नंबर प्लेट्स राज्यात प्रसिद्ध आहेतच. त्याशिवाय अनेकांना लकी नंबर किंवा युनिक नंबर गाडीच्या नंबर प्लेटसाठी हवा असतो. २०२५ सालात HR88B8888 या नंबर प्लेटसाठी १,१७ कोटी रुपयांची बोली लागली होती. आता त्याहीपुढे जाऊन आंध्र प्रदेशमधील एका व्यक्तीनं एका खास नंबर प्लेससाठी २.०८ कोटी रुपये खर्च केले आहेत.
मनीकंट्रोलने याबाबत बातमी दिली आहे. आंध्रप्रदेशच्या गुंटूर येथील खरेदीदार किरण कोलपाकुला यांनी DDC 0001 या नंबर प्लेससाठी बोली लावली होती. या क्षेत्राचे जाणकार सांगतात की, आता विशेष क्रमाकांच्या नोंदणीसाठीचे इच्छुक फक्त दिल्ली, मुंबई आणि इतर मेट्रो शहरातून येत नसून भारतातील इतर शहरांमधूनही असे लोक पुढे येत आहेत.
वापरलेल्या आलिशान गाड्यांची विक्री करणाऱ्या बिग बॉय टॉयझ या कंपनीकडून सदर नंबर प्लेटचा लिलाव करण्यात आला होता. या नव्या लिलावाच्या माध्यमातून कंपनीने एका नव्या क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे.
बिग बॉय टॉयझचे संस्थापक जतीन आहुजा यांच्याकडे डीडीसी ०००१ ही नंबर प्लेट पूर्वी होती. कार्टोकशी बोलताना आहुजा यांनी म्हटले की, इतक्या उच्च मूल्याच्या मालमत्तेचे व्यवहार करताना विश्वास, प्रमाणीकरण आणि पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच संग्रह करण्याची आवड असलेले हौशी लोक आता देशाच्या कानाकोपऱ्यातून पुढे येत आहेत.
वाहनांबाबत ऋची असलेल्या लोकांमध्ये ही बातमी वेगात पसरली. सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका एक्स युझरने म्हटले, “एवढ्या रकमेत एखादे चांगले वाहन विकत घेता आले असते. ज्यातून आणखी आनंद मिळाला असता. स्वॅग कधी कधी तुमचे पैसे पाण्यात घालतो.”
गाडीच्या किंमतीपेक्षा नंबर प्लेट महाग
दुसऱ्या एका युजरने लिहिले की, सदर गाडीच्या किंमतीपेक्षाही नंबर प्लेटची किंमत अधिक दिसते. ज्या गाडीसाठी ही नंबर प्लेट घेतली गेली, ती गाडी मारुती सुझुकी इग्नीस असल्याचे कळते. या गाडीची मुंबईतील किंमत ६.२९ ते ८.७९ लाख रुपये आहे.
२०२५ साली HR 88 B 8888 या नंबर प्लेटसाठी १.१७ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. परंतु बोली लावणाऱ्याने पुढील पैसे न भरल्यामुळे करार पुर्णत्वास जाऊ शकला नव्हता. नंतर ही नंबर प्लेट केवळ २६.७ लाख रुपयांना विकली गेली. त्यामुळे या नव्या व्यवहारामुळे आता डीडीसी ०००१ ही भारतातील सर्वात महागडी नंबर प्लेट ठरली आहे.

