आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका जोडप्याने आर्थिक अडचणींना कंटाळून गोदावरी नदीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या दाम्पत्याने आपल्या तीन वर्षांच्या मुलाचा देखील काही विचार केला नाही. नदीत उडी मारण्यापूर्वी या दाम्पत्याने त्यांच्या ३ वर्षांच्या मुलाला नदीच्या काठावर असलेल्या एका पुलावर मध्यरात्री स्कूटरवर एकटंच सोडून दिलं आणि या जोडप्याने नदीत उडी घेतली. या घटनेनंतर संपूर्ण आंध्र प्रदेशात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं घटना काय घडली?
आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका जोडप्याने आर्थिक अडचणींमुळे आपलं जीवन नदीत उडी मारून संपवलं असल्याची घटना समोर आली आहे. या दाम्पत्याने नदीत उडी मारण्यापूर्वी आपल्या ३ वर्षांच्या मुलाला नदीच्या काठावरील एका पुलावर मध्यरात्री स्कूटरवर एकटंच सोडून दिलं.
या दाम्पत्याने हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या पश्चात आपल्या मुलाचं काय होईल? तो कुठे जाईल? याचाही विचार केला नाही. दोड्डा साई (वय २९) आणि त्यांची पत्नी शिरीषा (वय २८) असं या जोडप्याचं नाव असून ते वेल्पुरू गावचे रहिवासी होते अशी माहिती आता समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
पोलिसांनी काय माहिती दिली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे रात्री १० च्या सुमारास आपल्या लहान मुलासह स्कूटरवरून नदीकाठी पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी मुलाला स्कूटरवरच सोडलं आणि दुथडी भरून वाहत असलेल्या गोदावरी नदीत उडी मारली. त्या ३ वर्षांच्या मुलाला अंधारात आणि थंडीत पुलावर एकटच सोडून दिलं. हा मुलगा रात्रभर स्कूटरवर बसून एकटाच रडत होता. तो मुलगा तिथे रडत असल्याचं पाहून तेथून जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली.
यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी त्या चिमुकल्या मुलाला ताब्यात घेऊन त्या मुलाच्या इतर नातेवाईकांच्या स्वाधीन केलं. तसेच पोलिसांकडून आता त्या जोडप्याचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी बचाव पथके आणि बोटींवरील पथकांच्या मदतीने नदीत शोध मोहीम सुरू केली आहे. हे वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत या जोडप्याचा शोध लागला नव्हता.
दरम्यान, प्राथमिक तपासातून अशी माहिती समोर आली आहे की, संबंधित व्यक्ती (वडील) चालक म्हणून काम करत होते. मात्र, वाढतं कर्ज आणि आर्थिक तणाव लक्षात घेता त्यांनी घर विकण्याचा निर्णय घेतला होता अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या घटनेचं एकमेव कारण आर्थिक अडचणी असल्याचं अधिकृतपणे निश्चित केलेलं नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
