Andhra Pradesh Mulls Social Media Ban for Under-16s: सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास ऑस्ट्रेलियाप्रमाणे बंदी घालण्याचा विचार आंध्रप्रदेश राज्य करत आहे. सरकारने याप्रकरणी चाचपणी सुरु केल्याची माहिती, राज्याचे शिक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि मानव संसाधन मंत्री नारा लोकेश यांनी दिली आहे. दावोस येथे वार्षिक आर्थिक परिषदेत मंगळवारी (२० जानेवारी) ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत मंत्री लोकेश यांनी यावर भाष्य केलं.
ऑस्ट्रेलियन कायद्याचा आंध्रा सरकारकडून अभ्यास
“सोळा वर्षाखालील मुलांसाठी ऑस्ट्रेलियाने केलेल्या कायद्याचा आंध्रप्रदेश सरकार अभ्यास करत आहे. आपल्याला सक्त कायदेशीर तरतूद करावी लागेल, असं मला वाटतं”, असे मंत्री लोकेश दावोस येथे ब्लूमबर्गशी बोलताना म्हणाले. ठराविक वयातील युवकांनी सोशल मीडियाचा वापर करणे योग्य नसल्याचे लोकेश यांनी यावेळी नमूद केले. “या वयातील युवकांना सोशल मीडियावर आपण काय पाहतोय याची जाणीव नसते”, असे लोकेश म्हणाले.
तांत्रिक आणि कायदेशीर अडचणीचा पेच
सोशल मीडिया कंटेटवर कठोर नियंत्रण आणि चुकीच्या ऑनलाईन कंटेटशी निगडीत एक याचिका सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. राज्यात अशाप्रकारच्या बंदीसाठी तांत्रिक तसेच, कायदेशीर अडचणी येऊ शकतात, असे तज्ञांचे मत आहे.
संपूर्ण अभ्यासाअंती निर्णय घेणार
चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टीचे (TDP) राष्ट्रीय प्रवक्ता दीपक रेड्डी यांनी सरकारच्या भूमिकेबाबत मत मांडले. “सोशल मीडियाचा तरुणांच्या मानसिकतेवर होणाऱ्या परिणामाबाबत मंत्री नारा लोकेश यांनी गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या १६ वर्षाखालील मुलांसाठीचा सोशल मीडिया कायद्याचा आणि योग्य जागतिक पद्धतीचा सरकार अभ्यास करत आहे”, असे रेड्डी म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू स्वत: टेक-सॅव्ही नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आंध्रप्रदेश राज्याचा माहिती तंत्रज्ञान आणि औद्योगिक केंद्र म्हणून ते प्रचार करत आहेत. अलिकडेच राज्याने डेटा सेंटरसाठी गुगलच्या अल्फाबेटसोबत १५ बिलियन डॉलरचा करार केला आहे.
ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक निर्णय
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने ऑनलाईन सुरक्षा तरतूद कायद्याअंतर्गत सोळा वर्षाखालील मुलांना फेसबुक, इन्स्टाग्राम, किक, रेडिट, स्नॅपचॅट, थ्रेड, टीकटॉक, एक्स, युट्युब आणि ट्विच या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापरावर बंदी घातली आहे. सोशल मीडिया वापरासाठी कमीतकमी वय १६ असावे असा ऐतिहासिक निर्णय तिथं सरकारने घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर आंध्रप्रदेशनेही असा निर्णय घेतल्यास सोळा वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडियावर वापरावर बंदी घालणारे आंध्रा पहिले राज्य ठरेल.
